पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/१०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

केला. विणकामाच्या शिक्षणाचा पाठपुरावा त्यानी सोलापुरात सर्वतऱ्हेची कामे करुन केला. १९१२ साली ३ मागांवर त्यानी कारखाना सुरु केला आणि त्याचा प्रचंड विकास केला. एकसष्टाव्या वर्षी त्यांची जी सुवर्णतुला झाली त्यातून एक ट्रस्ट निर्माण केला. त्यातून समाजातील विधायक कामाला मदत देण्याची योजना तयार केली. अखेरच्या पर्वात त्यानी ग्रंथ निर्मिती केली. 'कारखानदार कसा झालो' हे त्यांचे पुस्तक लोकप्रिय ठरले. वयाच्या ९१ व्या वर्षी १९७८ साली त्यांचे निधन झाले.

 संगीताचे गाढे व्यासंगी ग.ह. रानडे हे सांगलीचे सुपुत्र. त्यांचे शिक्षण सांगली येथे व पुण्यात फर्गसन कॉलेजमध्ये झाले. नंतर ते विलिंग्डनला फिजिक्स विषयाचे प्रोफेसर म्हणून आले. संगीतावर मराठी-इंग्रजीत त्यानी भरपूर लेखन केले. सुशिक्षतांचे संगीत, Hindustan Music, its Physics and Aesthetics व Music of Maharashtra ही त्यांची प्रमुख पुस्तके. संगीत नाटक अकादमीचे सल्लागार म्हणून त्यांची नेमणूक झाली. पुढे त्यानी Encyclopaedia of Music हा ग्रंथ सिद्ध केला. त्यांची संगीतावरची भक्ती आणि व्यासंग अनन्यसाधारण होता.

 नटवर्य मामा पेंडसे यांच्यावरील लेख रसिकतेने संपन्न आणि सविस्तर झाला आहे. त्यांची रंगभूमीवरील निष्ठा, त्यापायी उपसलेले कष्ट, केलेली हलकीसलकी कामे, नंतरचा रंगभूमीवरील प्रवेश आणि अभिनयाचे प्रात्यक्षिक, निरनिराळ्या भूमिकांतील अभिनयाला मिळालेले यश, केशवराव दात्यांचा लोभ, नंतर अनेक लहानसहान व्यवसाय करण्याची पाळी, मुंबईत सुरु केलेला दुधाचा धंदा आणि त्याचवेळी नाटक कंपन्याची येणारी आमंत्रणे, 'भाऊबंदकीत नाना फडणीसांची गाजलेली भूमिका, या सर्व गोष्टींचे तपशीलवार वर्णन लेखकाने केले आहे. नाना फडणीसांच्या भूमिकेने मामाना मुंबईत विशेष स्थान प्राप्त करुन दिले. मध्यंतरीच्या काळात पोटदुखीच्या विकारासाठी त्यांची तीन ऑपरेशन्स् करावी लागली. नंतरही त्यांच्या अनेक भूमिका संस्मरणीय ठरल्या. त्यांचे 'केशराचे शेत' हे आत्मचरित्र वाचनीय ठरले.

 दुसरे अभिनेते गणपतराव मोहिते उर्फ मा. अविनाश. लता मंगेशकर यांच्या घराण्याशी त्यांचा अनेक दशकांचा घनिष्ट संबंध त्यांच्या नव्वदीत आजही तो टिकून आहे. 'कुलवधु' या नाटकाशी आणि 'पायाची दासी' या चित्रपटाशी त्यांचे नाव कायमचे निगडीत आहे. गेली ८५ वर्षे त्यांचा मराठी रंगभूमीशी निकटचा संबंध आहे. मा. अविनाश म्हणजे मराठी नाट्यकलेचा या काळातला

सहा