पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समर्थांच्या वचनाप्रमाणे " आपुलिया सुखस्वार्था । केलीच करावी हरिकथा । हरिकथेविण सर्वथा राहोचि नये ।। " त्यानी आयुष्यात नऊ हजारांहून अधिक कीर्तने हरिसेवा म्हणून सहज केली असतील. परगावी कीर्तनासाठी साथीदार मंडळी घेऊन जायची वेळ आली तरीहि कोणाची कपर्दिकहि घेतली नाही. याबाबत बोलताना ते स्वतःच तुकाराममहाराजांचा दृष्टांत देत. तुकोबारायानी स्पष्टपणे सांगितलंय "जेथे कीर्तन करावे। तेथे अन्न न सेवावे ।। तट्टावृषभासी दाणा । घेऊ नये कधी जाणा ।। बुक्का लावू नये भाळा | हार घालू नये गळा ।।' असा इशारा देत पुढे तुकोबानी असं बजावलंय की, हरिदासाला देणारा आणि तो ते घेणारा असे दोघेहि नरकाला जातात-"तुका म्हणे देती । घेती तेहि नरका जाती" ।
 आजकाल ही गोष्ट कुणाच्या ध्यानातही येत नाही अितक्या सवंगपणाने कीर्तनाचा धंदा झाला आहे. तात्यासाहेबानी कीर्तन हे एक व्रत म्हणून चालवलेले होते. आवडीने स्वीकारलेले व सेवाभावाने चालवलेले ते एक "पवित्रतम व्रत" होते. कीर्तनकार म्हणून त्यांच्या बाबतीत सहज लक्षात न येणारी गोष्ट म्हणजे ते एक आत्मानुभवी साधुपुरूष व पराकाष्ठेचे क्रियाशील गुरुभक्त होते. त्यांच्या कीर्तनाची अंची आणि लोकप्रियता केवळ पाठांतर, वक्तृत्व, गायनवादन या गुणांवर अधिष्ठित नव्हती तर ती त्यांच्या आत्मानुभवाच्या जिव्हाळ्यावर होती.
 तात्यासाहेबांच्या अशा लोकविलक्षण कीर्तननिष्ठेमुळे, त्यांचे निरूपण ऐकण्यासाठी मोठमोठी मंडळी सांगलीत येत असत. संत वाङ्मयाचे महान अभ्यासक श्री. ल. रा. पांगारकर, श्रीमत् दीक्षितस्वामी, डॉ. कुर्तकोटी, समर्थभक्त श्री. शंकरराव देव, निंबाळचे गुरूदेव रानडे अशी मोठमोठी मंडळी त्यांच्या कीर्तनास आवर्जून उपस्थित राहिलेली आहेत. सांगलीत तर रोजची हजार-पाचशे भक्तमंडळी, रात्री नेमाने कीर्तनास येत. राजकुटुंबातील मंडळीना किंवा अच्चपदस्थांना सामान्य लोकांप्रमाणे श्रवणभक्ती. करता येत नसे. म्हणून सांगलीकर, इचलकरंजीकर, कुरूंदवाडकर अशा संस्थानिकांनी आपापल्या राजवाड्यांतून तात्यासाहेबांची खास कीर्तने आयोजित केली होती.

 तात्यासाहेबांची समाजातील प्रतिमा एका रसाळ कीर्तनकाराची होती. पण थोर संतांच्या मालिकेत शोभण्यासारखी त्यांची गौरवास्पद योग्यता आहे, म्हणजेच सिद्धावस्थेस पोचलेले ते साधुपुरूष आहेत, ही जाणीव त्यांच्या सर्वसामान्य भक्तजनांस नव्हती. फारच थोड्या निकटवर्तियांस ही गोष्ट ज्ञात होती. त्यांचे रसाळ चरित्र लिहिणारे साधुदास यानी दोन तीन अनुभव दिले आहेत. ते मोठे बोलके आहेत. एकदा १९०१ च्या प्लेगच्या साथीच्या दिवसात, सांगलीवासी मंडळी गावाबाहेर राहायला जात, तेव्हा तात्यासाहेब साधुदासांच्या मळ्यात राहायला आले होते. साधुदासांच्या


सांगली आणि सांगलीकर.................................................................. ६४