पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कीर्तनात जागा असे. संस्कृत वाङमयातील योगवासिष्ठ, शंकराचार्यांचे ग्रंथ, यातील अनेक अवतरणे ते सहजी अधृत करीतच, तर कधी भर्तृहरी, जगन्नाथपंडित हे सुध्दा त्यांच्या कथनात येत. नित्य कीर्तनात सहसा कविता येत नसत तरीसुध्दा मोरोपंत, वामनपंडित, मुक्तेश्वर त्यांच्या संग्रही होते. या छापील पुस्तकांखेरीज एकूण ८० हस्तलिखित चोपड्या त्यांच्याकडे होत्या. त्यांची मधुकरवृत्ती विलक्षण सजग होती. एखादा गोसावी दारावरून एखादे पद म्हणत गेला, ते पद त्याना आवडले, आणि आपल्या संग्रही ते पद नाही असा नुसता संशय वाटला तरी त्याला तात्यासाहेब बोलावून घेत. योग्य दक्षिणा देत आणि स्वहस्ते पदाची नक्कल करून घेतं.
 अशी जबरदस्त साधना असल्यामुळे त्यांच्या कीर्तनात नेहमीच नाविन्य भासे. ताजेपणा असे.
 तात्यासाहेबांच्या कीर्तनाचा आवाका जसा मोठा तसा त्यांच्या कीर्तनाचा थाहि विलक्षण असे. कीर्तनसाथ फारच मोठी आणि विविधतेने नटलेली असे. तबलजी, पेटीवाला, झांज, पखवाज आणि प्रत्यक्ष गाण्याची साथ करणारे असे सर्व मिळून बारापासून, वीसपर्यंत साथीदारांची संख्या असे. क्वचित यापेक्षा अधिकच. (आजच्या भाषेत म्हणजे ऑर्केस्ट्राच म्हणायला हवा!) तात्यासाहेबांचे चरित्रकार, कवि साधुदास स्वतः या साथीदारांमध्ये अभे राहून पदे म्हणत असत. त्यानी ह्या सर्व साथीदार मंडळींची नावे मोठ्या मजेदाररीतीने एका श्लोकात गुंफली आहेत. तो श्लोक असा:-

'काका 'झांज' धरी, 'जनू' सूर- करी, साथीस 'नाना' करी
'आप्पांचा ' पखवाज, 'दीक्षित' बसे सानंद पेटीवरी ।
'अंतोबा' करताल देति, 'पंता' मुखी मूर्छना
गातो गायन 'साधुदास; करिती 'तात्या' यदा कीर्तना ।"

 त्या त्या साथीदारांच्या प्रचारातील नावांवरून ही गुंफण होती. गंमत म्हणजे या साथीदार मंडळीत प्रतिष्ठित डॉक्टर, संगीतज्ञ, मामलेदार तर होतेच पण सांगलीजवळच्या कर्नाळचा न्हावी, शिरोळचा शिंपी, कोकेवाला अशी विविध थरातील मंडळी या ताफ्यात होती. वाकबगार पेटीवाला आणि अत्तम गाणारी मंडळी असतील तर तात्यासाहेब त्यांजकडून रागदारीची पदे म्हणवून घेत असत.

 तात्यासाहेबांचे कीर्तनाचे एक मोठे वैशिष्टय म्हणजे त्यानी कीर्तनाचा कधीहि 'व्यवसाय' केला नाही. अभ्या हयातीत एक नवा पैसा सुध्दा त्यानी कीर्तन केल्यावर घेतला नाही. अखंड २४-२५ वर्षे नित्यशः किमान दोन तास तरी कीर्तन केले.


सांगली आणि सांगलीकर................................................................ ..६३