पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



 प्रथम थोडेसे मंगलाचरण, नंतर सदगुरुंस नमन, तदनंतर निरूपणाचे पद्य अशा पद्धतीने तात्यासाहेब कीर्तनास प्रारंभ करीत. पद्य म्हणून झाल्यावर फार पाल्हाळ न लावता ते निरूपण करण्यास सुरूवात करीत. निरूपणास निवडलेल्या पद्याच्या विवरणास रंग भरायला लागे. साधुसंतांच्या वचनांचे आधार देत देत पूर्वरंग पूर्ण होई. त्यापुढे एखादे आख्यान, शेवटी संतांची गोष्ट, 'हेचि दान देगा देवा,"आरती खिरापत असं त्यांच्या दैनंदिन कीर्तनाचे सामान्यत: स्वरूप होते.
 सांगलीच्या भाविक मंडळीना एरवी पहावयास, ऐकावयास मिळणार नाही असे संतवाङमय त्यानी आपल्या कीर्तनातून वैपुल्याने ऐकविले. वेदांचे, अपनिषदांचे, भगवद्गीतेचे आणि साधु-संतांचे तत्त्वज्ञान एकच आहे, हे त्यानी पुन:पुन्हा श्रोत्याना पटवले. हरिभक्तीचा आणि गुरूभक्तीचा नमुनेदार आदर्श स्वतःच्या अदाहरणाने लोकांसमोर ठेवला.
 आणि मुख्य म्हणजे हे सगळे संत एकनाथांप्रमाणे संसारात 'राहून' त्यानी केले.
 त्यांच्या श्रोतेमंडळीमध्ये सामान्य कुणबी, नोकरवर्ग,सामान्य भाविक बायकांपासून तो अच्चविद्याविभूषित डॉक्टर्स, विद्वान हे सुध्दा असत. सुरवातीला वकीलमंडळींमध्ये 'टाळकुट्या कथेकरी' म्हणून त्यांची हेटाळणी होई. पण अनुभवांती हे पाणी काही 'वेगळेच' आहे ह्याची यथार्थ जाणीव त्या सर्वाना होऊ लागली. त्यांच्या अंगी संतपणाचे अतींद्रिय स्वरूप परिपक्व झाले आहे हे जाणकारांच्या हळू हळू लक्षात येऊ लागले.

 कीर्तनकारास अत्यंत आवश्यक गुण म्हणजे वेगवेगळे चपखल दाखले देणे. तेव्हा वेगवेगळ्या संतांची, कवींची काव्ये मुखोद्गत हवीत. तात्यासाहेबांचे पाठांतर विलक्षण होते. त्यांच्या स्वतःच्या संग्रहात १२२५ ग्रंथ होते. त्यात काही इंग्रजी होते. ते सर्व ग्रंथ त्यानी नुसतेच नजरेखालून घातले होते असे नाही तर त्या ग्रंथांचा त्यांचा अभ्यास होता. काही ग्रंथ तर त्यांच्या नित्यपाठात होते. ज्ञानेश्वर, निवृत्ती, सोपानदेव, गोरा कुंभार, सावता माळी यांच्या अपलब्ध असलेल्या सर्व रचना त्याना तोंडपाठ होत्या. तुकारामाची गाथा, एकनाथांची भजने - भारूडे त्याना मुखोद्गत होती. समर्थांचे सगळे ग्रंथ त्यांच्या नित्यपाठात होते. त्यातील शेकडो अवतरणे नेहेमीच्या कीर्तनात येत. याखेरीज नरसी मेहता, आनंदमूर्ती, दासोपंत, इत्यादिकांची पदे त्याना पाठ होती. कबीर, सूरदास, मीराबाई यांच्या रचनांचा त्यांच्या कीर्तनात सढळपणे वापर असे. इतकेच काय, पण कनकदास, पुरंदर विठ्ठल अशा कानडी कवीना पण त्यांच्या


सांगली आणि सांगलीकर................................................................६२