पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

झाली. अशा संभ्रमित अवस्थेत असताना नेहेमीप्रमाणे त्यांना लक्ष्मीअक्कांचा मार्गदर्शक सल्ला मिळाला. त्या म्हणाल्या, “बाबारे, हा विचार सुध्दा तू मनांत आणू नको. तुझ्या छायेखाली पाच-पंचवीस माणसं जगत आहेत आणि त्यांची संख्या अत्तरोत्तर वाढणार आहे. तुला वाडवडिलांच ऋण पण फेडायचं आहे...हाच धंदा नेकीने कर. थोडा अप्रशस्त मार्गाचा अवलंब करावा लागतो तर त्यावर उपाय म्हणजे रुपयातील एक आणा तू साधुमहाराजांपुढे कापूर जाळण्याप्रीत्यर्थ खर्च करीत जा, म्हणजे त्यांच्या कृपेने तुझे सर्व काही ठीक होईल.”
 असा कापूर किती खर्च झाला त्याचा हिशोबच नाही! मात्र अक्कांचा सल्ला बिनतोड ठरला. पुढे त्यांच्या आशिर्वादाप्रमाणे घराण्यावरचे सर्व कर्ज फिटले. दोन्ही वेळच्या पंक्तीला पाच-पन्नास माणसं जेवू लागली.
 तात्यासाहेब कोटणीस म्हटलं की कीर्तन असा एक द्वंद्व समासच डोळ्यासमोर येतो. एक अद्भुत वाटावी अशी विलक्षण कीर्तनपरंपरा त्यानी सुरू केली. १८८६ मध्ये त्याना गुरूपदेश मिळाला. तेव्हापासून वर्षातून किमान दोन वेळा, आराधना आणि रथोत्सवासाठी ते गुरूक्षेत्र चिमड येथे जाऊ लागले. तेथे त्यांनी प्रासंगिक स्वरूपाची छोटी कीर्तने केली होती. तेवढ्यावरून त्यांच्या कीर्तनगुणांची परीक्षा महाराजाना झाली होती "तुझी कीर्तने इत्युत्तर रसभरित होत जातील आणि ती ऐकावयास राजे लोकही येतील.” असा त्यानी तात्याना आशीर्वाद दिला. त्यावेळी तात्यांचे वय केवळ सव्वीस वर्षाचे होते. तरीसुध्दा 'नेटका प्रपंच' करण्याच्या कामामध्ये, वाढता प्रपंच आणि वाढते कर्ज अशा कात्रीत सापडल्यामुळे, पुढील सात-आठ वर्षे तरी त्याना 'कीर्तन प्रपंच' मांडण्यास सवड झाली नाही. मात्र १८९८ मध्ये तेरदाळला बिऱ्हाड मांडलेले असताना, घरमालक शंकरराव फडणीस यांच्या आग्रहाने आठवड्यातून सोमवार, गुरूवार या वारी आणि एकादशीला त्यांची कीर्तने सुरू झाली. १८९९ मध्ये अखेरीस एक चांगला योग आला. सांगलीच्या प्लेगच्या भीषण साथीमुळे आबासाहेब सांबारे तेरदाळला राहावयास आले होते. ते स्वतः हार्मोनियम वाजवत आणि तालाला फार पक्के असत. स्वत: तात्या आणि त्यांचे साथीदार तालाला थोडे कच्चे आहेत, हे लक्षात आल्यावर, आबासाहेबानी स्वतः मेहनत घेऊन, तात्यांचे कीर्तनातील हे तालाचे अंग पूर्णपणे अव्यंग केले! अत्तर आयुष्यात तात्यासाहेबाना त्याचा फार फायदा झाला.

 सांगलीत पुन्हा स्थायिक झाल्यावर मात्र त्यांची कीर्तने नियमितपणे होऊ लागली. याचं मुख्य कारण म्हणजे वकिली धंद्यात त्यांचा चांगला जम बसला. पत्नीच्या आजाराची तक्रार नष्ट झाली.


सांगली आणि सांगलीकर................................................................... ..६१