पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्याच कृपेने संपन्नता आल्यावर खरोखरीच तात्यानी आपला शब्द खरा केला !
 चिमड मठाच्या सोयी-गैरसोयी, रथोत्सवासारखे अत्सव या सर्व प्रसंगी अत्यंत पवित्र भावनेने तात्यानी चिमड - मठाची निरपेक्ष सेवा केली. आयुष्याच्या अखेरीस देहत्यागसुध्दा चिमडलाच करावा अशी त्यांची अिच्छा होती. पण तसा योग नव्हता! असो.
 बेळगाव-तेरदाळ सोडून तात्या सांगलीत आले. त्यानंतर सर्व चित्रच पालटले. सांगलीत आल्यापासून त्यांच्या अत्कर्षाची कमान अखेरपर्यंत चढतीच राहिली. आजवरचे त्यांचे जीवन हे एखाद्या गृहस्थाश्रमी सज्जनाचं असावं तसं होतं. आजमितीला तात्यांची जी 'प्रतिमा' सर्वज्ञात आहे, त्याची जडणघडण सांगलीच्या या वास्तव्यात झाली. यापुढील काळात तात्यासाहेब कोटणीस यांचे घर, त्यांची वकिली, व्यवसायातील मिळकत, त्यांची कीर्तन-प्रवचने हा रंजल्या-गांजल्या माणसांसाठी मोठाच निवारा ठरला.
 एक अत्यंत सदाचरणी, हुषार आणि यशस्वी वकील म्हणून सांगलीत स्थायिक झाल्यानंतर, थोड्याच काळात त्यांचा बोलबाला झाला. कोर्टात अकराच्या ठोक्याला ते बिनचूक हजर असत. मग जज्साहेब येवोत न येवोत! प्लेगच्या अपद्रवामुळे सांगली सोडून कवलापूर, बुधगावच्या माळावर वस्तीला जावं लागलं, तरी त्यांच्या नियमितपणाला बाधा येत नसे. कायद्याचा सखोल अभ्यास आणि स्तिमित करणारी स्मरणशक्ती, ही त्यांची वैशिष्ट्ये होती. आपल्या पक्षकाराची बाजू ते पूर्णपणे समजावून घेत त्याचवेळी विरूद्ध पक्षाचे म्हणणे काय आहे हे पण ते ऐकून घेत. त्यानुसार कैफियत तयार करत. वस्तुस्थिती आणि कायदा यांचा मोठ्या कुशलतेने ते मेळ घालीत. लॉ रिपोर्टसचे सतत वाचन, जुन्या निवाड्यांची चपखल माहिती, हजरजबाबीपणामुळे प्रतिपक्षास सहज निरूत्तर करण्याची हातोटी, यामुळे ते यशस्वी वकील झाले. हळूहळू त्यांची कीर्ती एवढी पसरत चालली की सांगलीखेरीज बुधगाव, इचलकरंजी, कुरूंदवाड, जत, जमखंडी इतक्या ठिकाणी त्यानी सनद काढली होती. वेळप्रसंगी सांगलीच्या संस्थानिकांविरूद्ध एखाद्या अशिलाचे वकिलपत्र घेण्यास ते कचरत नसत., मात्र अशिलावर खरोखरीच अन्याय झाला आहे, अशी खातरजमा झाली तरच !

 त्यांची परमार्थाची आवड वाढली, साधना वाढली, तसतसा त्याना आपला 'वकिली पेशा' अडचणीचा वाटू लागला. वकिलीचा धंदा हा सचोटीचा म्हणून कधीच समाजमान्य नव्हता. तेव्हा हा व्यवसाय सोडावा आणि दुसरा एखादा सचोटीचा, सात्त्विक स्वरूपाचा अद्योग करावा की काय, अशी चलबिचल त्यांच्या मनात सुरू


सांगली आणि सांगलीकर................................................................. ६०