पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुटुंब - कबिला. यामुळे संसाराचा गाडा ओढता ओढता तात्यांची दमछाक होऊ लागली. आपल्या अल्प वेतनात निर्वाह होत नाही. कर्जाचा बोजा वाढत चाललेला. या गोष्टी त्याना क्लेशकारक होत. आपली प्राप्ती वाढवावी या हेतूने त्यानी हायकोर्ट- प्लीडरच्या परीक्षेला बसण्याचे प्रयत्न केले. पण अभ्यासाला आवश्यक पुस्तके, बिकट आर्थिक परिस्थितीने घेता येत नाहीत, मनःस्वास्थ्य नाही, अशा कारणाने त्याना मुंबईत जाऊन परीक्षा पदरात पाडून घेण्याचे काही जमेना. त्या काळी सांगली संस्थानात स्टेट प्लीडरच्या परीक्षा होत. त्याला बसायचे तात्यानी ठरवले. सुदैवाने त्याना यश मिळाले. तेव्हा तात्यानी सांगलीत वकिली सुरू केली. कर्मधर्मसंयोगाने त्याचवेळी, त्यांचे परिचित आणि चिमडच्या महाराजांचा अनुग्रह मिळवून देण्यास कारणीभूत असलेले, महाराजांच्या सांप्रदायिकापैकी, वर अल्लेख आलेले बाबासाहेब मुजुमदार सांगलीतच वकिली करत होते. त्यांच्यामुळे तात्याना कामे मिळू लागली. आणि यापेक्षा मोठा फायदा म्हणजे कायद्याची पुस्तके आणि मोलाचे मार्गदर्शन त्याना बाबासाहेबांकडून मिळू लागले. तात्यांची अमेद वाढली. त्यानी फिरून एकवार डिस्ट्रिक्ट प्लीडरच्या परीक्षेसाठी मुंबईला जायचे ठरविले. या खेपेस मात्र त्याना यश लाभलं. आत्मविश्वास दुणावला. सांगलीपेक्षा बेळगावसारख्या मोठ्या ठिकाणी जाऊन वकिली करावी, असे त्यांच्या मनाने घेतले. त्याप्रमाणे १८९३ ते १८९७ या काळात त्यानी बेळगावला बिऱ्हाड केले. स्वतंत्र वकिली व्यवसाय करावा. त्यात प्रयत्नपूर्वक प्रगती करत अत्कर्ष साधावा. द्रव्य संपादन करावे ते घराण्याचे कर्ज निवारून, साऱ्या कुटुंबाची अर्जितावस्था साधण्यासाठी. हे हेतू पूर्ण होत असल्याने, बेळगाव हीच त्यांची पुढील आयुष्यात कर्मभूमी झाली असती. पण नियतीची तशी अिच्छा नसावी. त्यांच्या पत्नीला, बेळगावच्या हवेचा त्रास होऊ लागला. हवापालट म्हणून तेरदाळला राहून बघितले. तरी काही फरक पडेना. प्रख्यात धन्वंतरी आबासाहेब सांबारे यांच्या नजरेसमोर औषधोपचार करायचे, तर सांगलीतच राहायला हवे. म्हणून १९०० सालच्या एप्रिलमध्ये त्यानी सांगलीतच बिऱ्हाड थाटलं.

 मध्यंतरीच्या काळात खुद्द तात्यांवरच एक जिवावरचे दुखणे ओढवले. अचानक भूक मंद मंद होऊ लागली. अंगास जडपणा येऊन चेहऱ्यावर फिकट छटा दिसू लागली. सांगलीचे स्नेही आबासाहेब सांबारेना दाखवून औषधोपचार चालू होता. पण वैद्यराज सांगलीत आणि रुग्ण बेळगावात. मग गुण कसा यावा ? बरं, आबासाहेबानी निक्षून सांगितले होते की खडखडीत बरे व्हायचे असल्यास, सांगलीत येऊन राहणे आवश्यक आहे. हेळसांड झाल्यास अवघड आहे. कारण रोगाचे स्वरूप गंभीर आहे. या दुखण्याने तात्या एवढ्या जेरीस आले की या आजारातून आपण काही अठत नाही, असेच त्यांच्या मनाने घेतले. मग एवीतेवी देहत्याग करायचा तर मग तो


सांगली आणि सांगलीकर.................................................................. ५८