पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कोटणीसमहाराजानी केली. सामान्य संसारी जनांना भक्तिमार्ग विशद करून आत्मिक समाधानाच्या पदपथावर नेले.
 अशा या हणमंत पांडुरंग तथा तात्यासाहेब कोटणीस यांचा जन्म ७ नोव्हेंबर १८६४ रोजी सांगली संस्थानातील तेरदळ या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. कोटणीस घराणे हे पुरातन काळात 'नाईक - वडेर' या अपनावाने कर्नाटकातील केरूर गावात सुप्रतिष्ठित होते. विजापूर बादशहाच्या मूळ चाकरीत असलेले त्यांचे पूर्वज १७४६ च्या सुमारास विजापूर सोडून मुधोळ येथे स्थायिक झाले. मुधोळकर संस्थानिकानी या पूर्वजांना वाड्यातील 'कोटणिशी' (कोठीवरचे अधिकारी) दिली. मूळ हुद्दा कोठीनवीस किंवा कोठीनीस असा आहे. पण दोन्ही शब्द अच्चार करण्यास कठीण म्हणून लोक कोटणीस म्हणत. अशा तऱ्हेने ही मूळची नाईक - वडेर मंडळी 'कोटणीस' म्हणूनच ओळखली जाऊ लागली.

 तात्यांचे प्राथमिक शिक्षण मुधोळ येथे झाले. त्यांचे वडील पांडुतात्या यांचं निधन, तात्या १३ वर्षाचे असतानाच झाले. तेव्हा त्यांचे संगोपन त्यांचे पित्यासमान असलेले चुलते वामनकाका यानी मोठ्या ममतेने केले. पितृछत्र हरपल्याची बिलकूल जाणीव होऊ दिली नाही. चुलत्या-पुतण्याचे संबंध विलक्षण प्रेमाचे होते. अध्यात्मक्षेत्रात या जोडीचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. तात्यांच्या शालेय जीवनात दोन-तीन शिक्षक त्याना चांगले लाभले. पंडित दादाचार्य राघवाचार्य कट्टीशास्त्री यांजकडे त्यांचे संस्कृत अध्ययन झाले. नंतर वेदान्तावर 'ब्रह्मसिध्दांतमाला' नामक पुस्तक लिहणारे अद्वैतपंडित बाबा गर्दे त्याना शिक्षक म्हणून लाभले. त्यामुळे अनेक संतकवींच्या रचना तात्यांना विद्यार्थीदशेतच तोंडपाठ झाल्या होत्या. इंग्रजी विषयाची त्याना गोडी लागली, म्हणून त्यानी इंग्रजीचे मनापासून अध्ययन केले. इतके की त्यांचे इंग्रजी बघून पुढे मिरज हायस्कूलमधील त्यांचे संस्कृत शिक्षक, तात्यांचे, इंग्रजीचे विद्यार्थी. बनले! बरे, हे संस्कृत शिक्षक कोणी सामान्य पुरूष नव्हते. ते होते प्रख्यात इतिहास-संशोधक, नाटककार म्हणून अभ्या महाराष्ट्राला परिचित असलेले वासुदेवशाश्त्री खरे! मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी तात्यांना मुधोळ संस्थानची दरमहा आठ रूपयांची शिष्यवृत्ती मिळत असे. १८८२ मध्ये ते मिरज हायस्कूलमधून मॅट्रिक झाले. पुढे शिकण्याची अत्कट अिच्छा होती. पण पितृछत्र हरपलेले. एकत्र कुटुंब- पध्दतीमुळे कोटणीस कुटुंबियांचा बारदाना मोठा. घरावर कर्जाचा भार. त्यातच त्या काळच्या रीतीनुसार १७ व्या वर्षीच त्यांचे लग्न झालेले. तेव्हा आपल्या आदरणीय वामनकाकांच्या खांद्यावरचा भार हलका करण्याच्या दृष्टीने, तात्याना नोकरी करणे क्रमप्राप्त होते. संस्थानची शिष्यवृत्ती घेतली असल्याने, मुधोळ संस्थानची नोकरी


सांगली आणि सांगलीकर............................................................. ५६