पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दृष्टिकोन ठेवला. सर्वप्रकारचे शिक्षण आपल्या संस्थानात पाहिजे असे त्याना वाटत असे. त्यानी चाळीस वर्षे राज्य केले पण राजेपणाचा विलास केला नाही. राजे म्हणून सचोटीने जगले. संस्थान खालसा झाल्यावर ते सांगलीतच स्थायिक झाले. १९६५ साली ते काळाच्या पडद्याआड झाले.

 नटवर्य केशवराव दाते यानी सांगलीचे वर्णन नाट्यपंढरी असे केले. या पंढरीतले आद्य नाटककार श्री विष्णुदास भावे यांचा नंतर परिचय येतो. त्याना महाराष्ट्राचा भरतमुनी असे गौरवले आहे. भरतमुनीची थोरवी वेगळ्या क्षेत्रातील. विष्णुदास भावे पंडित वगैरे काही नव्हते. ते सामान्य गृहस्थ असले तरी हरहुन्नरी होते. चित्रकार, मूर्तिकार, बांधकाम तज्ञ, शेतकरी वगैरे. भावे मंडळी मूळ कोकणातली. विष्णुदासांचा पहिल्यापासून गाण्या-बजावण्याकडे ओढा होता. मध्यंतरी एका मांत्रिकाबरोबर ते पळून गेले होते. ते परत आल्यानंतर त्यांच्या कलागुणांकडे पाहून राजेसाहेबांनी त्याना खाजगीकडे ठेवून घेतले. १८४२ साली दशावतारी खेळ करणारी एक कर्नाटकातील कंपनी सांगलीस आली. तिचे रासवट उद्योग श्रीमंतांना ठीक वाटले नाहीत. त्यानी भाव्याना यापेक्षा चांगल्या नाट्यकृती तयार करण्यास प्रोत्साहन दिले. फार मोठ्या प्रयत्नाने मराठीतले पहिले नाटक 'सीता स्वयंवर' प्रसिद्ध झाले. त्यानंतर रामायणातील प्रसंगांवर त्यानी ८ / १० नाटके रचली. त्यानंतर त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात अनेक चढउतार आले पण ते हरहुन्नरी असल्याने त्यानी ते सर्व पार केले आणि बाहुल्यांचा खेळ निर्माण केला. तो त्यानी स्वतः सर्वतोपरी सिद्ध केलेला होता. विष्णुदास भावे सर्वार्थाने आद्य नाटककार होते.

 तिसरे प्रकरण गोविंद बल्लाळ देवलांवरचे आहे. देवलांनी नाट्यलेखन व नाटयशिक्षण यातच आपले उभे आयुष्य घालविले. नोकरी व्यवसाय केला नाही. त्यांचा जन्म १८५५ मध्ये सांगलीजवळच्या हरिपूर येथे झाला. तेथे संगमेश्वराचे प्रसिद्ध देवालय आहे. गोविंदरावांचे मोठे बंधू कृष्णाजीपंत हे संगीतशास्त्राचे जाणकार होते. मधले बंधू हे नावाजलेले नट होते. सांगलीत नाटकाचे जोरदार वातावरण होते. बेळगावात शिक्षणासाठी गेले असताना देवलांना आण्णासाहेब किर्लोस्करांचा सहवास लाभला. त्यांच्या 'शाकुंतल' नाटकावरून देवलाना नाट्यनिर्मितीची स्फूर्ती मिळाली. मृच्छकटिक आणि विक्रमोर्वशीय लिहिले गेले. 'झुंझारराव' 'संशयकल्लोळ' आणि मराठीतील अजरामर नाटक 'शारदा' निर्माण झाले. नंतरच्या आयुष्यातील चढउतार, नाटक कंपनीत मास्तर म्हणून झालेली त्यांची नियुक्ती, गंधर्व मंडळीतला प्रवेश, बडोद्याचे अधिपती

तीन