पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

टुमदार दत्तमंदिर बांधून घेतलं. त्यामध्ये ते प्रवचन करू लागले. दत्तमंदिर बांधले त्यावर्षी सतत आठ महिने त्यानी प्रवचने दिली. १९३८ साली दरवर्षीप्रमाणे प्रवचने देण्यासाठी सांगलीस आले असताना, दत्तमंदिरातच फेऱ्या घालताना कोसळले. त्याना पक्षाघाताचा झटका आला होता. त्याचा परिणाम त्यांच्या वाचाशक्तीवर झाला, बोलणे अस्पष्ट होऊ लागले. अितकेच नव्हे तर मेंदूवर थोडा परिणाम होऊन शब्द आठवेनासे झाले.
 दुर्दैवाचे भाले चारी बाजूनी रोखले जात होते. त्याना अर्धांगाचा झटका आला त्याच्या आदल्याच वर्षी त्यांची लाडकी सून, सौ. कमल (आप्पासाहेबांची पत्नी) गेली. नंतर नेहमी रुग्णाईत असलेला मुलगा विनायक गेला. जिने सर्व अडी- अडचणीतून दिवस काढले, नवाकाळ संकटात असताना आपले सर्व दागिने दिले, त्या सौ. गौरबाई अर्धांगाने खिळल्या. त्यांचा एक पाय कापावा लागला आणि अखेर १९४५ साली त्यांचे देहावसान झाले. हा आघात फार मोठा होता. त्या गेल्याचे कळल्यावर गांधीजी स्वतः काकासाहेबाना भेटायला आले. नुकत्याच कस्तुरबा वारल्या होत्या. गांधींजींचे मौन असल्याने काकासाहेबांचे सांत्वन करताना त्यानी लिहिलं, “आपण दोघे आता समदु:खी झालो."
 १९४३ साली त्यांच्या लाडक्या सांगली गावात भरलेल्या विष्णुदास भावे या सांगलीच्याच आद्य नाटककाराच्या शतसांवत्सरिक अत्सवातही काकासाहेब आपल्या विकलांग अवस्थेमुळे जाऊ शकले नाहीत. या प्रसंगी त्यांचा मोठा सत्कार करण्याची सांगलीकर नाट्यप्रेमींची अिच्छा अपुरीच राहिली याचे मानसिक क्लेश त्याना स्वत:ला किती झाले असतील !
 अखेरीस २६ ऑगस्ट १९४८ रोजी काकासाहेब शांतपणे अनंतात विलीन झाले.
 दुःखात सुख एवढेच की जी स्वातंत्र्याची सकाळ पाहण्यासाठी त्यानी आपली लेखणी-वाणी आयुष्यभर झिजवली, त्या स्वातंत्र्याची पहाटच नव्हे, तर सूर्योदयहि त्यानी पाहिला. आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता झाल्याचे मानसिक समाधान त्याना लाभले.
 तिसरी घंटा झाली, आणि त्या झुंझार पत्रकाराच्या आणि प्रतिभावंत नाटककाराच्या जीवननाट्यावर अखेरचा पडदा पडला!
 सांगलीच्या, त्यांच्या कृष्णाकाठच्या मळीतील दत्तमंदिरात, संध्याकाळी फिरत फिरत एखादा सांगलीकर नाट्यप्रेमी जातो तेव्हा त्याला सांगलीच्या या महान नाटककाराची आठवण येऊन, नक्कीच गहिवरून येत असेल !

●●●

सांगली आणि सांगलीकर...................................................... ५४