पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काकासाहेबानी ‘मेनका' नाटक लिहिले. १९२६ साली रंगभूमीवर आलेलें हे नाटक प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला आले नाही. गांधीजींच्या मताचा प्रचार करता करता नाटकाची कलात्मकतेची बाजू लंगडी पडली होती!
 'नवाकाळ' भरभराटीस येत असता मध्येच एकदम ठेच लागली! एखादं वृत्तपत्र जनमानसात लोकप्रिय होणे याचा दुसरा अर्थ होता सरकारी रोषास बळी पडणे.
 १५ मार्च १९२९ रोजी काकासाहेबांवर राजद्रोहाचा खटला भरण्यात आला. एक वर्षांच्या तुरूंगवासाची त्याना शिक्षा झाली. या काळात त्यांची प्रकृती जी ढासळली ती कायमचीच. शारीरिक दृष्ट्या खचलीच पण आश्चर्य म्हणजे मानसिक दृष्ट्या जास्ती खचली. लो. टिळकानी बंदिवासाच्या जीवघेण्या एकांतवासाच्या काळात मनाचा कणखरपणा कणभरसुध्दा ढळू दिला नव्हता, याचे अप्रूप काकासाहेबाना आता फार जाणवले.
 अिथं आणखी एक योगायोग आवर्जून सांगण्यासारखा आहे. काकासाहेबांच्या लेखांमुळे टिळकाना शिक्षा झाली होती. काकासाहेबाना ज्या लेखाबद्दल राजद्रोहाची शिक्षा झाली तो लेख त्यानी लिहला नव्हता. तो लिहिला होता दुसऱ्याच सहसंपादकाने. बहुधा न. र. फाटक यानी तो लिहिला होता अशी वदंता होती. इतिहासाची पुनरावृत्ती होते ती अशी!
 तुरुंगवासातून आल्यानंतर काकासाहेबानी 'नवाकाळ' ची संपादकीय सूत्रेपण हाती घेतली नाहीत. आप्पा सगळं व्यवस्थित संभाळतोय हे पाहून सगळा कारभार त्यालाच सांभाळायला सांगितला. वास्तविक स्वातंत्र्याची चळवळ जोरात सुरु होती. मिठाचा सत्याग्रह जनतेने अपूर्व उत्साहाने अचलून धरला होता. सरकारी दडपशाही चालूच होती. अहिंसक प्रतिकार विलक्षण संयमाने चालू होता. अशावेळी काकासाहेबांची लेखणी एखाद्या तरवारीसारखी परजायला हवी होती. पण तसं का होत नव्हतं याचं सर्वानाच कोडं पडलं होतं. पुन्हा म्हणून त्यानी संपादकीय लेखणी हाती धरली नाही त्यांच्या आजवरच्या पत्रकारी जीवनातील ही न समजणारी शोकांतिका होती.
 नाही म्हणायला त्यानी आपलं नाट्यलेखन चालू ठेवलं होतं, पण मेनका, सावित्री, सवतीमत्सर या सर्व नाटकांतून गांधीजींच्या तत्वज्ञानाचा प्रचार केल्यामुळे की काय ती नाटकं निष्प्रभ ठरली होती. टिळकयुगातील त्यांची एकूण तडफ, त्वेष, गांधीयुगात नाटकातूनही मावळला होता. त्यांच्या लाडक्या बालगंधर्वाच्या नाटकमंडळींची वाताहात झाली होती. एकूणच नाट्यव्यवसाय सिनेमाच्या आगमनाने ओहोटीस लागला होता.

 आता काकासाहेबांचा ओढा अध्यात्माकडे लागला होता. सांगलीस ते अधूनमधून विश्रांतीसाठी येत. कृष्णानदीच्या काठावरील आपल्या मळीमध्ये त्यानी एक छोटसं


सांगली आणि सांगलीकर.............................................................. .५३