पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काही टिळकपंथीयानी मुंबईत एक मराठी दैनिक सुरू करायचं ठरविलं होतं. आता अशा दैनिकासाठी खाडिलकरांपेक्षा योग्य संपादक कोण मिळणार? खाडिलकरांनी आनंदाने होकार दिला.
 ९ मार्च १९२१ पासून त्यानी मुंबईतील नव्या दैनिकाची, 'लोकमान्य' ची संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली. 'केसरी' पर्वानंतर काकासाहेबांच आता 'लोकमान्य' पर्व सुरू झालं. काही काळ, म्हणजे एक दोन वर्षे बरी गेली. मग मात्र व्यवस्थापनाशी त्यांचे मतभेद होऊ लागले, म्हणून वैतागून त्यानी 'लोकमान्य' सोडला.
 दुसरीकडे त्यांच्या नाटकातील घोडदौडीला पण अचानक ब्रेक लागला! त्यांचे नवीन नाटक 'द्रौपदी' साफ पडलें. अव्वाच्यासव्वा खर्च केल्यामुळे आणि बालगंर्धवांच्या गलथान आर्थिक व्यवहारामुळे नाटकास मोठा फटका बसला, लेखक म्हणून त्यांचेकडेहि अपयशाबद्दल अंगुलीनिर्देश केला गेला, याचे त्याना मनस्वी दुःख झाले. लोकमान्यांसारखा गुरू गेला. त्याच सुमारास हरितात्यांसारखा वडिलांचे ठिकाणी असणारा ज्येष्ठ बंधू गेला म्हणून 'द्रौपदीच्या' अपयशाने त्यांचे ठायी थोडे नैराश्य आले. त्यामुळे मन नाट्यलेखनापासून किंचित् दूरच गेले.
 'लोकमान्य' पत्र सोडल्यावर पुढे काय? हा प्रश्न अभा राहिला. वृत्तपत्रीय लिखाणाची अर्मी त्याना गप्प बसू देईना. लोकजागृतीसाठी वृत्तपत्रलेखन करायची तर अिच्छा होती. पण कुणाची ताबेदारी त्याना नको होती, तसेच मत्सर करणारे सहकारी पण नको होते. अशा परिस्थितीत पर्याय एकच होता. तो म्हणजे स्वत:चेच वृत्तपत्र सुरू करणे. समाजात त्यांची स्वत:ची अशी काही पुण्याओ होतीच. पाठीशी चाहते आपणहून गोळा झाले.
 'लोकमान्य' सोडल्यावर अवघ्या महिनाभरातच ७ मार्च १९२३ रोजी त्यानी स्वतःचे वर्तमानपत्र सुरू केले.
 त्याचे नाव ‘नवाकाळ' (आजहि हे पत्र जोरात चालू आहे.) 'नवाकाळ' हे आता तिसरे पर्व सुरू झाले. पूर्वीचा अनुभव कामी आला. पहाता पहाता 'नवाकाळ' लोकप्रिय झाला. खप दिवसेंदिवस वाढू लागला. नवी कल्पना म्हणून साप्ताहिक "नवाकाळ" सुरू करण्यात आला. गांधीजी, टिळकांचेच धोरण राबवून स्वातंत्र्यलढा पुढे नेत आहोत अशीच काकासाहेबांची धारणा असल्याने त्यानी गांधीजींच्या नेतृत्वाची भलावण केली. त्यामुळे 'नवाकाळ' ने चांगलेच बाळसे धरले. अर्थात यात गांधीजींच्या लोकप्रियतेचाही भाग होता.

 मन आता थोडे स्थिरचित्त झाले. ५-६ वर्षांच्या नाट्यलेखनसंन्यासानंतर


सांगली आणि सांगलीकर.................................................... .५२