पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 त्यापाठोपाठ १९१३ साली त्यांचे 'विद्याहरण' रंगभूमीवर आले. त्याचेही प्रयोग धुमधडाक्यात सुरू झाले.
 'केसरी' तून सुटका ही एकप्रकारे अिष्टापत्तीच ठरली!
 यानंतरच्या काळात नाटककार म्हणून ते प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईतच झाले. नाटकांचे ‘हाऊसफुल्ल' प्रयोग धुमधडाक्याने चालू लागले. आर्थिक सुबत्तेमुळे त्यांच्या पत्नीला, गौरबाईना, आता सढळ हाताने खर्च करता येऊ लागला. १९०६ साली 'यशवंत' अर्फ आप्पा (पुढील काळातील 'नवाकाळ' चे संपादक) आणि १९०८ साली ‘विनायक' या मुलांचा जन्म झाला. पुढे १९१५ मध्ये दोन्ही मुलांच्या थाटात मुंजी झाल्या. हा काळ म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सर्वात सुखाचा कालखंड म्हणता येईल.
 अशी सुखाने मार्गक्रमणा चालू असताना, अचानक एक दिवस, आनंदाची बातमी आली. लोकमान्यांची सुटका झाली. १९१४ मध्ये ते गायकवाडवाड्यात आल्याचे कळल्यावर, दोन्ही मुलाना घेऊन, काकासाहेब त्याना भेटायला गेले. मंडालेसारख्या विजनवासातील तुरूंगवास भोगून परतलेल्या आपल्या गुरूचे दर्शन घेताना त्यांचे आनंदाश्रू थांबत नव्हते.
 मग त्या दोघांमध्ये काय संवाद झाला माहीत नाही, पण दुसऱ्याच दिवसापासून काकासाहेब 'केसरी' मध्ये रूजू झाले. अशा सहजतेने की जसं काही मध्यंतरीच्या काळात काही घडलचं नव्हतं! टिळक आल्यावर थंडावलेले राजकारण पुन्हा तापू लागले. सुरत काँग्रेसपासून राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पडलेले जहाल- मवाळ गट, मुस्लीम व अितर जमाती, या सर्वांनाच स्वराज्यप्राप्तीच्या कामी एकत्र आणावे, असा विचार लोकमान्यानी लखनौच्या अधिवेशनप्रसंगी मांडला होता. त्याला अनुसरून जातीय ऐक्याची अभंग फळी निर्माण करण्याच्या दृष्टीने काकासाहेब नव्या जोमाने, नव्या अत्साहात 'केसरी' त लिहू लागले.
 काही दिवस चांगले गेले आणि एक दिवस अचानक त्यांच्या अत्साहावर पाणी पडले. १ ऑगस्ट १९२० रोजी लो. टिळकांचे दुःखद निधन झाले.
 पुन्हा १९१०च्या इतिहासाची पुनरावृत्ती झाली. कुठं माशी शिंकली कुणास ठाऊक? पण केसरीचे ट्रस्टी म्हणून असलेले काकासाहेबांचे नाव काटले गेले.
 जड अंत:करणाने काकासाहेबाना 'केसरी' चा निरोप घेतला. पण पारतंत्र्याविषयी चीड निर्माण करण्याचा वसा पुढे कसा चालवायचा, याचा त्याना प्रश्न पडलाच नाही. अचानकपणे तो प्रश्न सोडवला गेला.

 टिळकांच्या मृत्यूनंतर त्यांच्या जहाल राजकारणाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी,


सांगली आणि सांगलीकर......................................................... ..५१