पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या नाटकावर बंदी घातली!
 नाट्यक्षेत्रात काकासाहेबांची कीर्ती अशी दुमदुमत असताना, लोकमान्य तुरूंगवासात गेल्यावर, केसरीच्या कामात मात्र कटकटी सुरू झाल्या. आजवर खाडिलकर आणि केळकर, लोकमान्यांचे डावे-उजवे हात म्हणून वावरत होते. दोन्ही माणसे मातब्बर. लोकमान्यांसारखे लोकोत्तर नेतेच त्या दोघांना ओकत्रपणे सांभाळू शकत होते. पण तेच तुरूंगवासात अडकल्यावर, जुने मतभेद उफाळून आले. वास्तविक केसरीत खाडिलकरांनी लिहावे आणि मराठ्याचं काम केळकरानी पहावं, अशी व्यवस्था झाली असताना, कोणतीहि पूर्वसूचना न देता दोन्ही पत्रांचं (डिक्लरेशन) प्रगटन केळकरानी आपल्या एकट्याच्या नावे करून टाकले!
 शेवटची काडी पडली. आपल्या स्वाभिमानाचा अनादर होत आहे, असे वाटून, खाडिलकरांनी मुकाटपणे 'केसरी' सोडला.
 ही घटना दुर्दैवी खरीच, पण दुहीचा शाप असलेल्या महाराष्ट्राला नवीन नक्कीच नव्हती.
 अर्थात् 'केसरी' सुटला तरी जनजागृतीचे काम करणारे दुसरे माध्यम काकासाहेबांच्या हातात होतेच.
 कीचकवधानंतर लिहिलेल्या 'भाऊबंदकी' नाटकाने (१९०९) त्याना चांगलाच हात दिला होता. त्या नाटकाने पण प्रचंड लोकप्रियता मिळविली. नाटक हे अपजीविकेचे साधन होऊ शकते याचा त्याना नव्यानेच स्वतः पुरता शोध लागला.
 यातूनच अभ्या महाराष्ट्राला वेडं लावणारं, गुंगवून टाकणारं द्वैत जन्माला आलं. ते म्हणजे बालगंधर्व-काकासाहेबांचा संयोग .
 बालगंधवींच्या स्वर्गीय गाण्याने काकासाहेबाना संगीत नाटके लिहिण्याची प्रेरणा मिळाली. वास्तविक आजवरची त्यांची नाटके गद्य होती. पण आता गंधर्वासाठी संगीत नाटके लिहायची, म्हणून त्यानी गाण्याचा अभ्यास सुरू केला. अनेक गवयांच्या नामवंत चिजा ऐकल्या. आणि यातून जन्माला आले ते रंगभूमीवरील सदाबहार नाटक 'मानापमान' दि. १२ मार्च १९११ रोजी त्याचा पहिला प्रयोग किर्लोस्कर संगीत मंडळीने मुंबईत केला. नानासाहेब जोगळेकरांचा 'धैर्यधर, गणपतराव बोडस यांचा 'लक्ष्मीधर' आणि खुद्द बालगंधवांची 'भामिनी' . सुंदर सुंदर नाट्यपदांनी नटलेले हे नाटक अशा काही चढत्या श्रेणीने रंगत गेले की पहिल्या प्रयोगापासूनच प्रेक्षकानी या नाटकाला डोक्यावर घेतले.

 या नाटकाच्या यशाने काकासाहेबाना मोठाच हात दिला.


सांगली आणि सांगलीकर.................................................................. ५०