पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अत्साहाने केसरीच्या कामास लागले. पण आता फक्त केसरीचे लेखन एवढंच काम नव्हतं. आता त्याना लेखणीबरोबर वाणीपण देशकार्याला जुंपायची होती. कारण लोकमान्य टिळक आता केवळ महाराष्ट्राचे पुढारी नव्हते तर अवघ्या हिंदुस्थानचे पुढारीपण त्यांच्याकडे चालत आले होते. गव्हर्नरजनरल लॉर्ड कर्झनच्या जुलुमी, घमेंडखोर राजवटीमुळे, त्याने केलेल्या बंगालच्या फाळणीमुळे, वंगभंग चळवळ जोरात पेटली होती. फाळणीमुळे बंगाल चेतला, त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात लो. टिळकानी केसरीतील लिखाणातून, देशभर दौरे काढून, व्याख्यानाद्वारा पुरा हिंदुस्थान पेटवून दिला. ‘भारतीय असंतोषाचे जनक' म्हणून ब्रिटीश सरकार त्यांच्याकडे दात ओठ खाऊन बघत होते. लोकमान्यांचे बिनीचे वीर या नात्याने 'केसरीतून' काकासाहेबानी जळजळीत लेखांची सरबत्ती केली. अनेक परिषदा, सभा, मेळावे, यातून अत्यंत प्रक्षोभक भाषणे करून, त्यानी सर्वत्र एकच दंगल अडवून दिली.............
 आणि त्यातूनच पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती झाली!
 केसरीतील प्रक्षोभक लेखांनी सरकार हवालदिल झाले. पुन्हा टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला गेला आणि १९०८ मध्ये त्याना मंडाले येथे सहा वर्षांच्या शिक्षेवर पाठवले गेले. काकासाहेबांच्या मनाला आत्यंतिक क्लेश देणारी बाब म्हणजे, ज्या लेखामुळे लोकमान्यांना शिक्षा झाली, तो पुन्हा एकदा त्यांच्याच स्वतःच्या (काकासाहेबांच्या) हातचा होता! त्यामुळे काकासाहेबाना किती यातना झाल्या असतील, ते त्यांचे त्यानाच माहीत! पण धीरोदात्त टिळकांच्या तोंडून त्यासंबंधी ब्र निघाला नाही !
 अकीकडे कर्झनशाहीच्या विरोधात काकासाहेबांचे लिखाण चालू होतेच, पण त्यांच्या मनातील नाटककार अस्वस्थ होता. कर्झनविषयीची चीड लोकांच्या मनात निर्माण करायची, तर नाटकाच्या मनोरंजक माध्यमाची आवश्यकता होती. या विचारमंथनातूनच ‘कीचकवध' या मराठी रंगभूमीवरील अजरामर नाटकाचा जन्म झाला. महाभारतातील मदांध, अर्मट, मस्तवाल कीचकाच्या माध्यमातून, त्यानी कर्झन यथार्थपणे अभा केला. गांजलेली द्रौपदी (सैरंध्री) म्हणजे विवश भारतमाता अण कीचकाच्या छातीवर बसून वज्रप्रहार करणारा भीम म्हणजे साक्षात् लोकमान्य, ही प्रमुख साम्यस्थळे लोकाना एवढी भावली, इतकी पटली, की ते नाटक महाराष्ट्रातील लोकानी अक्षरश: डोक्यावर घेतले. १९०७ ते १९१० पर्यंत हजारो लोकानी नाटकाचे प्रयोग बघितले. जनप्रक्षोभ वाढू लागला. काकासाहेबाना अभिप्रेत असलेली पारतंत्र्याची चीड लोकांमध्ये प्रकर्षाने वाढू लागली..........

 या साऱ्याचा परिणाम अटळ होता. ब्रिटीश सरकारने १९१० सालच्या फेब्रुवारीत


सांगली आणि सांगलीकर.......................................................... ..४९