पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

जाणार नाही, याची त्याना जाणीव होती. मात्र सशस्त्र क्रांतीची शक्यता कितपत आहे, याची चाचपणी ते नक्कीच करत होते. आणि या मंथनातूनच खाडिलकरांचे नेपाळ प्रकरण उद्भवले.
 नेपाळमध्ये जर्मनीतील शस्त्रास्त्रे बनवणाऱ्या 'क्रप्स' नावाच्या कारखानदाराचे साहाय्य घेऊन, रायफलींचा कारखाना काढावयाचा आणि त्यायोगे सैन्याची अभारणी करुन, सशस्त्र अठाव करायचा, असं या गुप्त योजनचं स्वरूप होतं.
 आता अशा कामगिरीसाठी अत्यंत विश्वासू माणसाची योजना करणे आवश्यक होते, हे तर उघडच आहे. काकासाहेब खाडिलकरांसारखा दुसरा माणूस कोण मिळणार? आता काकासाहेबाना गुप्तपणे पाठवायचे म्हणजे कुठले तरी सोंग वठवायला हवे. त्यानी कोणते सोंग वठवावे? चक्क मंगलोरी कौले बनविणाऱ्या कारखानदाराचे. ‘कृष्णराव' हे नाव धारण करून नेपाळमध्ये त्यानी वास्तव्य केले. आयुष्यात ज्यानी मातीची खेळणी बनविण्यासाठीसुद्धा चिखलात हात माखून घेतले नसतील, अशा काकासाहेबानी कौले बनविणाऱ्या शास्त्राची कष्टपूर्वक माहिती करून घेतली, नव्हे चक्क कौले बनविली! देशाच्या स्वातंत्र्यासाठी, आपल्या नेत्याच्या आदेशानुसार, काहीही करण्याची तयारी असणारी, अशी प्रखर देशभक्त माणसं बघितली, की आजच्या परिस्थितीत शरमेने मान खाली घातली जाते! त्यापुढची कमाल म्हणजे बंदुकीचा कारखाना उभारण्यात या ना त्या कारणाने विलंब होऊ लागला, कौलाचे काम संपले होते. नेपाळात वास्तव्य कायम ठेवण्याच्या दृष्टीने कोणता तरी उद्योग करणे आवश्यक होते, तेव्हा या काकासाहेबानी काडीपेटी तयार करणेचा कारखाना अभारण्याची तयारी सुरू केली! त्यातला 'गंध' सुध्दा माहीत नसताना! दुर्दैवाने नेपाळात लपत-छपत राहून, सर्व प्रकारची संकटे सोसून (भाषा, हवामान, अन्न सर्व भिन्न!) बंदुकीचा कारखाना अभारण्याची शक्यता दिसेना, स्वकियांच्या फंदफितुरीने या गुप्त बेताचा सुगावा ब्रिटीशाना लागला आहे याची शंका येताच 'कृष्णरावानी' आपला नेपाळातील गाशा गुंडाळला! ब्रिटीश सत्तेने जंगजंग पछाडले तरी नेपाळमधील ‘जंग' मंडळीनी थांगपत्ता लागू दिला नाही, म्हणून काकासाहेबांचे निभावले. एरवी फासावर मान लटकणे अशक्य नव्हते. दुर्दैवाने या प्रकारात १९०१ ते १९०४ अशी अमेदीतील तीन वर्षे खर्ची पडली.

 नेपाळ प्रकरणाच्या अयशस्वी समाप्तीनंतर, काकासाहेब विश्रांतीसाठी सांगलीत येऊन राहिले. नेपाळच्या हवेत त्याना मलेरियाचा खूप त्रास झाला. पाच-सहा महिन्यांच्या सांगलीतील विश्रांतीनंतर, त्यानी पुण्यातच बिन्हाड मांडायचे ठरविले.. त्यानुसार आई, पत्नी आणि दोन मुलीना घेऊन ते पुण्यात आले. १९०५ पासून पुन्हा


सांगली आणि सांगलीकर.................................................................... ४८