पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करावी लागली. ही करामत त्यानी एवढ्या कौशल्याने केली, की प्रो. मॅक्समुल्लर प्रभृती विद्वानांच्या प्रयत्नाने, सहा महिने आधीच तुरुंगातून सुटका झालेल्या टिळकानी, काकासाहेबांची मनापासून पाठ थोपटली. इतकेच काय, पण ६ सप्टेंबर १८९८ रोजी मुक्तता झाल्यावरसुद्धा, ४ जुलै १८९९ रोजी केसरीचे संपादकपद घेऊन 'पुनश्च हरिः ओम' करेपर्यंतच्या दहा महिन्यांच्या काळात, निर्धास्तपणे केसरीची सूत्रे काकासाहेबांकडेच टिळकानी राहू दिली. इतका त्यानी लोकमान्यांचा विश्वास संपादन केला होता. खुद्द टिळकानी आपल्या अग्रलेखात म्हटलंय की “सांधा जेव्हा बेमालूम जडेल, किंबहुना सांधा केला आहे की नाही याचीच पाहणाऱ्याला भ्रांत पडेल, तेव्हाच सांधा लावणाऱ्याचे कसब दृष्टीस येते. अशा प्रकारचा बेमालूम सांधा खाडिलकरांनी जडविला होता, हे केसरीच्या वाचकाना कळून आलेच आहे.”
 किती लाखमोलाची शाबासकी !
 साहित्यसम्राट न. चिं. केळकर आणि नाट्याचार्य खाडिलकर म्हणजे लो. टिळकांचे डावे-उजवे हात. (दोन्हा 'नाटक्ये' निघाले हे त्यांच्याविषयीचे टिळकांचे गमतीचे मत). केळकर आणि खाडिलकर यांची तुलना अप्रस्तुत असली, तरी खाडिलकरांनी टिळकांच्या लिखाणाची धाटणी एवढी आत्मसात केली होती की दोघांचे अग्रलेख वेगवेगळे ओळखणे कठीण व्हावे. टिळकांचे विचार व भिन्नभिन्न विषयांवरील मते काकासाहेबानी एवढी अभ्यासली होती, की अखाद्या विषयावर टिळकाना कशा प्रकारचा लेख अपेक्षित आहे, याचे आपसूक ज्ञान काकासाहेबाना असे. प्रतिपक्षावर जोरदार आघात करताना, हातचे काही राखायचे नाही, त्याला पुरा लोळवायचा, अशी त्यांची वृत्ती असे. (न.चिं. केळकर यालाच अगदी ' शेणखतात लोळवणे' असे म्हणत.)
 लो. टिळकानी संपादनाची धुरा घेतल्यावर, काकासाहेबानी काही काळ सांगलीत विश्रांती घेतली आणि लोकमान्यांच्या सल्ल्यानुसार एल. एल. बी. पूर्ण करण्यासाठी ते मुंबईला गेले. (कायद्याचं ज्ञान संपादकाला आवश्यक आहे असं टिळकाना वाटे.) त्याच सुमारास द. आफ्रिकेतील बोअर युध्द सुरू झाले. मूठभर बोअर लोकानी शस्त्रसज्ज इंग्रज फौजेशी जो यशस्वी सामना केला, त्याने प्रभावित होऊन काकासाहेबानी 'गनिमी काव्याचे युद्ध' ही रम्य युद्धकथा - लेखमाला केसरीत लिहिली. अर्थात् त्यामुळे एल. एल. बी ची पुस्तके बाजूलाच पडली!

 याच कालावधीच्या सुमारास, टिळकांच्या मनात सशस्त्र क्रांतीसंबंधात काही विचार घोळत असावेत. ( क्रांतिवीर वासुदेव बळवंताच्या गुप्त बैठकांना तरुणपणी ते जात होतेच) क्रांतिकारकांच्या वैयक्तिक प्रयत्नांना सहानुभूती असली, तरी केसरीमधून त्यांचे समर्थन कधी होत नसे. अशा एकट्या-दुकट्याच्या प्रयत्नानी परिणाम साधला


सांगली आणि सांगलीकर............................................................. .४७