पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 हा कृष्णाजीपंतांच्या, नव्हे तर काकासाहेबांच्या, आयुष्याला दिशा देणारा मोठा टप्पा होता. (आता त्याना काकासाहेब म्हटले जात असे.)
 काकासाहेबाना आता त्यांच्या आवडीचे क्षेत्र मिळाले होते. लोकजागृती करण्यासाठी म्यानाबाहेर पडायला उत्सुक असणाऱ्या तलवारीला रणभूमी मिळाली होती. ब्रिटीश सरकारवर टीकेची झोड अठवणे, लोकाना निर्भयतेची शिकवण देणे, नव्या नव्या राजकीय, सामाजिक, औद्योगिक प्रश्नांवर जागृती करणे, या कामात त्यांच्या धारदार लेखनशैलीची आणि संपादनकौशल्याची कसोटी लागली. त्याच सुमारास सर्वत्र दुष्काळ पडला. सोलापूर-विजापूर भागातील स्वरूप तर फारच भयंकर होते. ‘केसरी' त माहितीपर लेख लिहिण्याच्या दृष्टिकोनातून काकासाहेब त्या भागात दौऱ्यावर गेले. ते काम चालू असताना मनातील नाटककार सजग होताच. विजापूरचा उध्वस्त किल्ला बघितला तेव्हा मनात जी काही स्पंदने झाली, त्यातून त्यांच्या “कांचनगडची मोहना" या नाटकाची निर्मिती झाली. प्लेगच्या साथीच्या वेळी ते सांगलीला राहायला आले, तेव्हा त्यानी नाटकाचे प्रत्यक्ष लिखाण केले. पुढे हे नाटक प्रसिध्द झाले आणि २४ डिसेंबर १८९८ रोजी त्याचा पहिला प्रयोग पुण्यात झाला.
 १८९७ च्या वर्षात पुण्यात प्लेगची साथ आली. पण ती परवडली असं म्हणण्याची वेळ लोकांवर आली. कारण प्लेगचा रोगी शोधण्याच्या निमित्ताने गोऱ्या इंग्रज सोजिरानी लोकांची जी ससेहोलपट केली, जुलूमजबरदस्ती केली, त्यामुळे सामान्य लोकांचे जिणे मुष्किल झाले. 'केसरी' ने जुलुमी अधिकाऱ्यांवर आणि सरकारवर टीकेची झोड उठविली. लोकांचा क्षोभ वाढत गेला, त्याचे पर्यवसान पुण्यातील जुलुमी अधिकारी रँडच्या खुनात झाले. हा सारा प्रक्षोभ केसरीतील लिखाणाने झाला, अशी सरकारची भावना झाली. त्यामुळे या ना त्या कारणाने सरकार टिळकाना अडकवण्यासाठी संधी शोधत होते. ती त्याना केसरीतील लेखावरून मिळाली. गंमत म्हणजे ज्या लेखावरून टिळकांवर राजद्रोहाचा खटला भरला गेला तो मुळात त्यांच्या हातचा नव्हता तर तो लेख काकासाहेबानी लिहिला होता. मात्र संपादक म्हणून त्याची संपूर्ण जबाबदारी टिळकांनी स्वीकारली. आपल्यामुळे टिळकांवर तुरुंगवासाची पाळी आली याचं काकासाहेबाना किती दुःख झालं असेल! टिळक मात्र तो खेळाचाच एक भाग असे समजून चालले. हा त्यांचा केवढा मोठेपणा !

 लो. टिळकाना १४ सप्टेंबर १८९७ रोजी १८ महिन्याची शिक्षा झाली. या काळात 'केसरी' ची संपूर्ण जबाबदारी काकासाहेबांकडे होती. टिळकांची 'केसरी' मधील ठाम भूमिका तशीच पुढे चालू ठेवायची पण निमित्त शोधत असणाऱ्या सरकारचे गंडांतर तर येऊ द्यायचे नाही, अशी दुहेरी कसरत या काळात काकासाहेबाना


सांगली आणि सांगलीकर............................................................... ४६