पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नव्हते. कृष्णेच्या पाण्यात पोहणारा जीव अथांग समुद्रातील अंच अंच लाटांवर आरूढ व्हायला बघत होता.
 निबंधकार चिपळूणकर, पुण्यात जवळून पाहिलेले टिळक, यांच्या व्यक्तिमत्वाच्या प्रभावाने, स्वातंत्र्य-संपादनाच्या खडतर राजकारणात स्वतःला झोकून द्यावे, अशी अनिवार ऊर्मी त्याना गप्प बसू देईना. बाह्यात्कारी, कुटुंबाची आर्थिक दुरवस्था दूर करण्याच्या हेतूने, वकिलीचे शिक्षण घ्यावे म्हणून त्यानी एल.एल.बी. करण्यासाठी सांगली सोडली व ते मुंबईला आले.
 एकीकडे अभ्यास चालू होता पण मनातील खळबळ कशी काय शांत करावी हे त्याना समजेना.
 अशा चिंतेत असताना अचानक त्याना हवा तो रस्ता मिळाला. त्याची मौज अशी झाली.
 "ब्राह्मण आणि त्याची विद्या" या नावाचा एक ग्रंथ नुकताच प्राचार्य गोळे यानी लिहिला होता. त्याचे परीक्षण करणारा लेख कृष्णाजीपंतानी “विविधज्ञानविस्तार” या मासिकात लिहिला. या लेखात त्यांच्या स्वतःच्या उत्कट देशभक्तीच्या विचारांचे, मानसिक आंदोलनांचे जणु प्रतिबिंबच पडले होते. या लेखाकडे अनेक विचारवंतांचे लक्ष गेले, तसे लो. टिळकांचे पण गेले. या लेखातल्यासारखे बाणेदार राष्ट्रीय विचाराचे स्वाभिमानी तरूण "केसरीला" मिळतील तर बरे होईल असे उद्गार त्यानी नारायणराव कानिटकरांकडे काढले. हे गृहस्थही नाटके लिहणारे होते. त्यामुळे त्यांची व खाडिलकरांची ओळख होती. मग ते खाडिलकरांना घेऊन टिळकांकडे गेले. प्रथम भेटीतच टिळकानी त्याना “केसरी” साठी लेख लिहायला सांगितला. विषय सुचवला, "राष्ट्रीय महोत्सवाची आवश्यकता." तो दिवस रविवारचा होता. सर्व माहिती गोळा करून अत्साहाने खाडिलकरानी लेख लिहिला.. मित्राना दाखवून, जरूर त्या सुधारणा करून, टिळकांकडे दिला. मनात धाकधुक होती. टिळकाना लेख आवडेल का? का नापसंत म्हणून परत करतील?
 त्याकाळी “केसरी” मंगळवारी प्रसिध्द होत असे.
 सोमवारचा दिवस बेचैनीत गेला.
 मंगळवारी पाहतात तो काय! त्यांचा लेख प्रसिध्द झाला होता. नुसता लेख म्हणून नव्हे तर चक्क अग्रलेख म्हणून छापला होता !

 सगळं कसं स्वप्रवत् घडलं होतं. अनिश्चिततेच्या भोवऱ्यात डगमगताना त्यातून मार्ग सापडावा म्हणून जी नाव ते शोधत होते ती नावच अचानक त्यांच्या हाती आली होती !


सांगली आणि सांगलीकर............................................................................. ..४५