पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पुस्तकाचे पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग केले आहेत. पहिल्या भागात सांगली नगरीची पूर्व पीठिका व विकासाचा इतिहास सांगितला आहे. तर उत्तरार्धात बावीस नामवंत सांगलीकरांचा परिचय करुन दिलेला आहे. शेवटी परिशिष्टात आणखी काही सांगलीकर, सांगली मधील कांही प्रेक्षणीय स्थळे, नामवंत संस्था, गेल्या दोनशे वर्षांमधील महत्त्वाच्या घटना, सांगलीचा दुर्मिळ नकाशा, दुर्मिळ फोटो इत्यादी बाबींची माहिती देण्यात आलेली आहे. याप्रकारे हा सांगली परिचय परिपूर्ण करण्याचा साक्षेपी प्रयत्न टिळकांनी केलेला आहे. ही रचना विचारपूर्वक व आस्थेने केली आहे.

 'सांगली - एके काळची रम्या नगरी' हे पहिले प्रकरण. प्रथम सांगलीच्या परिसराची भावार्त आठवण दिली आहे आणि नंतर नगरीचा इतिहास आठवला आहे, इ.स. १०२४ पासूनचे उल्लेख नोंदविले आहेत. सांगलीचा स्पष्ट उल्लेख इ.स. १६५९ साली लिहिलेल्या 'शिवभारत' या संस्कृत काव्यात आलेला आहे. सांगली या नावाविषयी अनेक समजुती आहेत. कृष्णा नदीच्या एका उंचवट्यावरचे सहा गल्ली असलेले गाव म्हणजे सांगली, कर्नाटकी पद्धतीचे नाव संगलकी, संगमावरचे म्हणून संगमी, त्यांचा अपभ्रंश होऊन सांगली. सांगलीचा इतिहास म्हणजे पटवर्धन राजघराण्याचाच इतिहास. १८०१ साली पहिले चिंतामणराव पटवर्धन यांनी सांगलीचे वेगळे संस्थान बनविले. नंतर वसंतदादा पाटील यांच्या काळापर्यंतची हकिगत आली आहे. या ठिकाणी विकसित झालेले उद्योगधंदे हळदीची प्रसिद्ध बाजारपेठ, इथे निर्माण झालेली नाट्यपरंपरा, शिक्षण व क्रीडा या क्षेत्रांतील नावलौकिक याबद्दलचा आढावा गौरवाने घेतला आहे.

 दुसरे प्रकरण सांगलीचे राजेसाहेब चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन (दुसरे) यांच्या संबंधीचे आहे. त्यांच्या घराण्याचा पूर्वेतिहास, राजपदाची योगायोगाने झालेली प्राप्ती, त्याना दिले गेलेले विचारपूर्वक शिक्षण, कॅप्टन बर्कसारख्या कर्तबगार प्रशासकाचे मार्गदर्शन, नंतर त्यानी प्रत्यक्ष राज्यकारभार करताना ब्रिटिश सरकार व संस्थानी प्रजेच्या अपेक्षा यामध्ये राखलेला समतोल, विवाहाच्या संदर्भात त्यानी दाखविलेल्या ठामपणा, त्यानी राज्यकारभारात आणलेला एकजिनसीपणा, दर्जा राखण्यासाठी सेवानिवृत्त आय.सी.एस अधिकाऱ्यांची नियुक्ती, इत्यादी बाबींचे दर्शन घडवते. संस्थानच्या सर्वांगीण प्रगतीसाठी राजेसाहेबांनी अथक प्रयत्न केले. जमिनीची सुधारणा केली. उद्योगधंदे सुरु केले. दांडेकर, भिडे, वेलणकर, शिरगावकर यांचे कारखाने उभे राहण्यास प्रेरणा दिली. बँका उभ्या केल्या. संस्थानात लोकशाहीचे रोपटे रुजवले. शिक्षणविषयक पुरोगामी

दोन