पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या सरदेसाईंमुळे झाली हे ऋण खाडिलकरानी फार मानलं.
 नाटकं पहाण्याचा नाद सांगलीकराला जणू अपजतच असतो. कृष्णाजीपंतांच्या बालपणीच त्याना हा नाद एवढा लागला की विद्यार्थीदशेतच त्यानी एक छोटं नाटक लिहून बघितलं ! १८८९ साली ते मॅट्रिकची परिक्षा उत्तम तऱ्हेने पास झाले. थोरले बंधू हरितात्यांची आपल्या धाकट्या भावावर पुत्रवत् माया होती, त्यांच्या हुशारीचे त्याना कौतुक होते, म्हणून त्यानी फारशी सुस्थिती नसतानाही कृष्णाजीला कॉलेजशिक्षणासाठी पुण्याला पाठवले. बरोबर काही सांगलीचे मित्र होतेच. या सर्वांचे आश्रयस्थान म्हणजे सांगलीकरांचा पुण्यातील वाडा. सर्व मित्र तिथे एकत्र रहात. पुण्याच्या अच्च वातावरणात कृष्णाजीपंतांची खरीखुरी मानसिक जडणघडण झाली. तो काळ चिपळूणकर - आगरकर व टिळक यांच्या कर्तृत्वाचा होता. त्यांच्यामुळे पुण्यात एक वेगळेच असे चैतन्याचे वारे वहात होते. देशभक्तीची प्रखर भावना प्रत्येकाच्या मनात जागृत झाली होती. फर्गसनमध्ये एक वर्ष काढल्यावर कृष्णाजीपंतानी डेक्कन कॉलेजमधे नाव घातले; कारण त्यांच्या आवडीच्या तत्त्वज्ञान विषयाचे नामांकित प्रोफेसर सेल्बी तेथे होते म्हणून. अभ्यास करतानाच दुसरीकडे त्यांच्या नाट्यविषयक आवडीस खतपाणी घातलं जात होतंच. 'हॅम्लेट' नाटकाचे प्रयोग बघून त्याना शेक्सपीयरचे आकर्षण याच काळात निर्माण झाले.
 बी.ए. झाल्यावर ते सांगलीला आले. सांगली हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून नोकरीला लागले. घरसंसाराचा गाडा ओढायला मदत व्हावी हा हेतू होताच. दोन वर्षे शिक्षकाचे काम त्यानी आस्थेवाईकपणे केले. याच काळात त्यांनी त्यांचे पहिले नाटक (अगदी बालपणीचे लुटुपुटूचे सोडून) 'सवाई माधवरावाचा मृत्यू' हे लिहून काढले. पुण्यातील वास्तव्यात शेक्सपीयरच्या आकर्षणापोटी "हॅम्लेट आणि ऑथेल्लो' बघितल्यापासूनच त्या दोन्ही नाटकानी ते फार प्रभावित झाले होते. पेशवाईतील विचारी पण विकारी अशा सवाई माधवरावांवर हॅम्लेटचा आणि मंत्रतंत्राच्या कामात वाकबगार अशा केशवशास्त्री या पात्रावर ऑथेल्लोमधील आयागोचा बेमालूम पोशाख चढवून त्यानी मराठी साहित्यातील एका अजरामर नाटकाला जन्म दिला. नाट्यक्षेत्रातील त्यांची पहिलीच अडी, पराक्रमी हनुमंताच्या जन्मत:च घेतलेल्या अडीसारखी देदीप्यमान् ठरली!
 सांगलीतील त्यांचा जीवनक्रम तसा मजेत चालला होता. जुन्या काळाप्रमाणे लग्न होऊन सौ. गौरबाईंना पहिले अपत्य झाले होते. सांगली नगरवाचनालयात चांगली पुस्तके मिळत. शिक्षकी पेशा चांगला चालला होता. मित्रमंडळ होतेच.

 तरीपण कृष्णाजीपंतासारख्या गरूडवृत्तीच्या तरुणास या परिस्थितीत समाधान


सांगली आणि सांगलीकर....................................................................... ४४