पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
प्रखर देशभक्त नाट्याचार्य
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर



 सांगलीला ‘नाट्यपंढरी’ म्हणून ज्यांच्यामुळे गौरविले जाते ते कै. विष्णुदास भावे सांगलीचे. त्यानी लावलेले नाटकाचे रोपटे जोपासून त्याची वाढ केली ते कै. देवल सांगलीचे. आणि पाठोपाठ ही 'हॅटट्रिक' पुरी करणारे कै. कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर पण सांगलीचेच. ह्या विलक्षण योगायोगाचे नाट्यप्रेमी सांगलीकरास केवढे अप्रूप वाटावे? कसल्या का आवाजात असेना, पण खाडिलकरांचे नाट्यपद गुणगुणणारा असा नाट्यवेडा सांगलीकर घराघरात आढळेल.
 अशा या खाडिलकरांचा जन्म २३ नोव्हेंबर १८७२ रोजी सांगलीत झाला. दुर्दैवाने त्यांच्या वडिलांचा, प्रभाकरपंतांचा मृत्यू कृष्णाजीपंतांच्या जन्माच्या आधीच चार महिने झाला होता. बापाच्या मुळावर आलेला मुलगा म्हणून सर्वानी राग धरला, पण प्रत्यक्ष जन्मदात्या आईने तर एवढा दुस्वास केला की त्या तान्ह्या मुलाला अंगावर पाजायला पण ती तयार नव्हती! शेजारच्या पटवर्धनांच्या बिऱ्हाडातील मनुकाकू नावाच्या बाई नुकत्याच बाळंत झाल्या होत्या. त्यानी दया येऊन कृष्णाजीपंताना आपल्या नवजात मुलाचा भाऊ समजून अंगावर पाजले व त्याचे संगोपन केले. अर्थात् जन्मदात्या आईचा राग किती काळ टिकणार? पतिवियोगाने दुःखी झाल्यापोटीचा राग कालांतराने मावळून तिने आपल्या मुलाला मांडीवर घेतला. एकंदरीत महाभारतकालीन कृष्णाप्रमाणेच या कृष्णाच्या नशीबी पण "देवकीने वाहिला! यशोदेने पाळिला" असा प्रकार होताच!

 कृष्णाजीपंतांचं प्राथमिक शिक्षण सांगलीच्या विष्णुघाटावरील दादा छापखाने यांच्या शाळेत झालं. या शाळेमुळे त्यांचं हस्ताक्षर चांगलं झालं. वर्गात अभ्यासात हुषार असले तरी अंगात हूडपणा फार. नदीकडेच्या वाळवंटात खेळणं, तासन् ता नदीत डुंबणं यात बराच वेळ जाई. इंग्रजी शाळेत गेल्यावर तेथील बापू सरदेसाई नावाच्या शिक्षकाची त्यांच्यावर फार छाप पडली. त्यांच्या अफाट वाचनाचा व वक्तृत्वाचा परिणाम म्हणून कृष्णाजीपंताना त्या दोन्ही गोष्टींची आवड लागली. भावी आयुष्यात लेखक व वक्ता म्हणून त्याना जी दिगंत कीर्ती लाभली तिची पायाभरणी


सांगली आणि सांगलीकर.................................................................................. .४३