पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाटकावरून म्हटलेले 'संशयकल्लोळ', ऑर्थर मर्फीच्या ( All in the Wrong) आणि फ्रेंच नाटककार मोलिअरच्या 'गानारेल' या नाटकांशी जवळीक साधणारे आहे. एका प्रियकराने प्रेयसीला दिलेली तसबीर परपुरूषाकडे सापडून त्या प्रियकराने आणि ज्या परपुरुषाला सापडते त्याच्या बायकोने संशयग्रस्त होऊन घातलेले थैमान, ही या नाटकाची मध्यवर्ती कल्पना. पुरूष पात्राना फाल्गुनराव, अश्विनशेठ, वैशाखशेठ अशी मराठी महिन्यांची नावे आणि स्त्री पात्राना कृत्तिका, रेवती, रोहिणी अशी नक्षत्रांची नावे देवलानी बहाल केली आहेत. कृत्तिकेच्या तोंडी "घाईत घाई आणि विंचू डसला ग बाई,” “नवी नवलाची आणि वापरली की कवडीमोलाची" अशासारख्या रोजच्या बोलण्यातील अस्सल मराठमोळी म्हणी वापरल्यामुळे हे नाटक रूपांतरित आहे, असे चुकूनही वाटत नाही. भिक्षा मागणारा रामदासी, मोरावळा, गालावरचा तीळ, शालू, दागिने अशा भुल्लेखांमुळे नाटकात परकीय अंश औषधांपुरताही शिल्लक राहात नाही! सात्विक करमणूक करणारे आणि अकारण संशयाचे दुष्परिणाम दाखविणारे 'संशयकल्लोळ' हे एक बहारदार नाटक आहे. देवलांच्या काव्यातील प्रासादिकपणा जसा 'शारदे' तील पदांत अतरला आहे तसाच या नाटकातील पदांमध्ये अतरला आहे. 'सुकांत चंद्रानना,' 'कर हा करी धरिला शुभांगी,' 'संशय का मनि आला' अशासारखी साधी, सुंदर पदे आणि त्यांच्या अप्रतिम, सोप्या वळणाच्या सतत गुणगुणाव्या वाटणाऱ्या चालीमुळे 'संशयकल्लोळ' च्या व्यावसायिक यशाची बाजू अधिकच बळकट झाली. बालगंधर्वानी आपल्या अभिनयाने आणि स्वर्गीय गाण्याने अजरामर केलेली 'रेवती' आणि गणपतराव बोडस यांचा 'फाल्गुनराव' यामुळे या नाटकाला दिगंत कीर्ती लाभली. नवरा-बायकोमधील संशय हा कालातीत विषय असल्याने हे नाटक सदाबहार राहिले आहे. काळाच्या ओघात देवलांची बाकी नाटके विसरून गेली तरी या नाटकाचा टवटवीतपणा कधीच कमी होणार नाही.
 पण काय दैवदुर्विलास पाहा? जे 'संशयकल्लोळ' नाटक, रसिकानी दहा दहा, वीस वीस वेळा बघितलं, ते नाटक रंगभूमीवर आलेलं देवलाना काही बघायला मिळालं नाही. मधुमेह त्यांच्या शरीरात घर करून त्याना पोखरत होताच. बुटाला खडा लागल्याचे निमित्त होऊन त्यांच्या डाव्या पायाला जखम झाली. ती काही केल्या भरून येईना. साखरेचे प्रमाण बेसुमार वाढलं होतं. मिशन हॉस्पिटलच्या प्रख्यात डॉ. वानलेसनी शर्थ केली. पण काही उपयोग झाला नाही.
 १३-१४ जून १९१६ च्या मध्यरात्री त्यांच्यावर मृत्यूने झडप घातली. त्यांच्या जीवननाट्यावर नियतीने अखेरचा पडदा टाकला!

 आणि चारच महिन्यानंतर, रंगभूमीवर, २० ऑक्टोबर १९९६ रोजी 'संशयकल्लोळ' चा पडदा अुघडला !


सांगली आणि सांगलीकर................................................... ४२