पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

थिऑसफीची दीक्षा घेतली होती. सांगली - हरिपुरात वास्तव्य असले तरी त्यांचा बराचसा वेळ नाटक-कंपन्यातून नाटके बसवून देण्यात जाई. मात्र ते फक्त स्वत:ची व आपले गुरू अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या नाटकांखेरीज अन्य कोणाची नाटके बसवून देत नसत. सांगलीत १९०१ मध्ये रामभाऊ गोखले, कानिटकर, गोरे वगैरे मंडळीनी जी 'सामाजिक नाटक मंडळी' काढली होती, त्यांची नाटके देवल बसवून देत असत. भाऊराव कोल्हटकर असेपर्यंत किर्लोस्कर नाटकमंडळीत त्याना मोठा मान होता. मात्र १९०१ साली भाऊरावांच्या मृत्यूनंतर शंकरराव मुजुमदार यांजकडे नाटकमंडळींचे सर्वाधिकार आल्यावर, त्यांच्याशी देवलांचे खटके अडू लागले. आपला पूर्वीसारखा मुलाहिजा ठेवला जात नाही हे पाहून " आपण किर्लोस्कर कंपनीत पुन्हा पाऊल टाकणार नाही" अशी प्रतिज्ञा करूनच ते बाहेर पडले.
 पुढे किर्लोस्कर नाटकमंडळीमधून बालगंधर्व, गणपतराव बोडस, गोविंदराव टेंबे आदी मंडळी बाहेर पडली आणि त्यांनी १९१३ च्या सुमारास 'गंधर्व नाटक मंडळींची' स्थापना केली. त्या सर्वाना देवलांची नाट्यक्षेत्रातील योग्यता माहीत असल्याने त्यानी देवलाना नाट्यगुरू म्हणून आपल्या कंपनीत मानाने नेले. अर्थात तिथेही 'मानापमानाचा' प्रश्न होताच. कारण गंधर्व नाटकमंडळीत बालगंधर्वांचे लाडके नाटककार आणि देवलांचे गाववाले, नाट्याचार्य खाडिलकर आधीच सुप्रतिष्ठित होते. खाडिलकरांचे थोरले बंधू त्याना पित्यासमान होते. आणि अशा पितृतुल्य - बंधूंचे देवल मित्र आहेत आणि ज्येष्ठ नाटककार आहेत अशा आदराच्या भावनेतून खाडिलकर देवलांशी अदबीने वागत. बैठकीत बसले तरी स्वतःकडे कनिष्ठपणा घेऊन जरा दूर बसत. त्यामुळे या दोघा सांगलीकर नाटककारांत कधी बेबनाव झाला नाही. देवल फक्त स्वत:ची व अण्णासाहेब किर्लोस्कर यांची नाटके बसवत तर खाडिलकर आपल्या नाटकांच्या तालमी स्वतः घेत.
 गंधर्व नाटकमंडळी १९१६ च्या आरंभी बडोद्याच्या मुक्कामात असताना तेथील अधिपती सयाजीराव गायकवाड यानी, एखादी विनोदप्रचुर कॉमेडी रंगभूमीवर आणावी असे सुचवले. त्यावेळी देवल कंपनीत होते. त्यांना नवीन नाटक लिहिण्यासंबंधात विचारण्यात आले. देवलांची प्रकृती ठीक नसल्याने आणि त्यातच त्यांचा मधुमेह त्रास देत असल्याने, नवीन नाटक लिहणे शक्य नव्हते. मग गणपतराव बोडस यानी देवलांच्याच जुन्या ‘फाल्गुनराव' नाटकाला संगीताची जोड देऊन ते रंगभूमीवर आणावे असे देवलाना सुचवले. ती कल्पना देवलाना आवडली. लागलीच ते सांगलीला आले. आणि यातून जन्माला आले ते सदाबहार नाटक 'संशयकल्लोळ'.

 मराठी रंगभूमीवरील रूपांतरित नाटकांची छाननी केली तर 'संशयकल्लोळ' नाटक, त्या सर्व नाटकांचा मुकुटमणी शोभेल. देवलानी स्वतः एका विलायती


सांगली आणि सांगलीकर............................................................. .४१