पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुंदर चालींची पदे यामुळे हे नाटक अल्पावधीतच लोकांनी डोक्यावर घेतले. सांगलीचे एक प्रसिद्ध नाटककार कै.न.ग. कमतनूरकर यानी देवलांची रुपांतरित नाटके आणि एकमेव स्वतंत्र नाटक 'शारदा', यासंबधात टिप्पणी करताना गंमतीनं म्हटलयं की 'शारदा' देवलांची औरस संतती असल्याने तिलाच देवलांचे नाव सांगण्याचा हक्क आहे. बाकीची नाटके हौसेने पाळावयास आणलेल्या 'परदेशी' मुलाप्रमाणे आहेत. त्यांच्या पालकानी कितीहि हौसेने, कितीहि ममतेने त्यांचे पालनपोषण केले, तरी ती अधूनमधून आपल्या मूळ 'घराण्याची' ओझरती पाझरती ओळख दाखविल्याशिवाय रहात नाहीत. "
 'शारदा' नाटकाने आर्थिक दृष्ट्या देवलाना फारच फायदा करून दिला. देवल मित्रमंडळीत म्हणत असत की 'शारदा' नाटकाने, त्याच्या नावातल्या प्रत्येक अक्षराचे तीन हजार रूपये मला दिले आहेत.” या नाटकाने प्रयोगापोटी म्हणजे हक्कापोटी व पुस्तकांच्या आवृत्तीवर असे मिळून देवलाना पंचवीस हजार रूपये मिळवून दिले असे गणपतराव बोडस यानी लिहून ठेवले आहे. ९०-९५ वर्षापूर्वीचा काळ आणि त्याकाळची रुपयाची किंमत लक्षात घेता ही रक्कम नक्कीच अभिमानास्पद होती. देवल आपल्या नाटकांच्या हक्काबाबत कमालीची जागरूकता दाखवत. आपल्या गुणांचा आणि श्रमांचा यथायोग्य मोबदला पदरात पाडून घेताना, ते यत्किंचितह दयामाया दाखवत नसत. मालकी हक्कांच्या संबंधात असा विशेष पायंडा पाडण्याचे श्रेय देवलाना दिले पाहिजे. आपल्या परवानगीवाचून प्रयोग केल्याबद्दल काही नाटकमंडळ्यांवर दावे लावून त्यानी कोर्टातून ते जिंकल्याचीही अदाहरणे आहेत. ही व्यवहारदक्षता अनेकांच्या टीकेस पात्र झाली हे खरे असले, तरी बालपणी व तरूणपणाच्या सुरूवातीच्या काळात, त्यानी दारिद्र्याचे जे चटके भोगले ते पाहता त्यांचे वर्तन दोषास्पद निश्चितच वाटत नाही, शिवाय नाट्यव्यवसाय हाच त्यांचा पूर्ण वेळेचा व्यवसाय होता हे लक्षात घेतले पाहिजे.

 पत्नीचे दुःखद निधन झाले तेव्हा देवल ४२ वर्षांचे होते. नामदार गोखले, हरिभाऊ आपटे यासारख्या सुधारणावादी मित्रमंडळीत त्यांची अठबस असे. तरीपण पुनर्विवाहाचा विचार करण्याइतके त्यांचे मन तयार झाले नसावे. कदाचित 'शारदा' नाटकाच्या लेखकाला तसं करणं शोभणार नाही असेहि त्याना वाटून गेले असेल. सांगलीच्या मळ्यात निवांत रहावे, चिंतन करावे असा त्यांच्या मनाचा कल झाला असावा. सांगली गावातील वडील बंधू कृष्णाजीपंत यांजकडे ते जेवायला जात. डॉ. देव यांच्याकडे मित्रमंडळीत गप्पा मारत. पण स्वभावतः ते आत्मकेंद्रित वृत्तीचे, मानी व तापट होते. कुटुंबियात वावरताना ते फार मनमोकळेपणाने वागत नसत. हळूहळू तत्वचिंतनाकडे व परमार्थाकडे त्यांचे मन लागू लागले होते. १९१० साली त्यानी


सांगली आणि सांगलीकर................................................................ ४०