पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आणि पदे देवलानी लिहिली होती. पत्नीच्या दुःखाने व्यथित झालेल्या देवलांची लेखणी काही काळ स्तब्ध झाली. पण मनाच्या तळागाळात रूतून बसलेली शारदेची वेदना त्याना स्वस्थ बसू देईना. आणि अखेर दोन वर्षानंतर म्हणजे १८९८ साली, देवलानी ‘शारदा' नाटकाचे लेखन पूर्ण केले.

 देवलांच्या एकूण सात नाटकांमध्ये त्यांच्या 'शारदा' या नाटकाला अतिशय महत्त्व आहे. समीक्षकांच्या मते त्यांची सहा नाटके एका पारड्यात आणि शारदा नाटक दुसऱ्या पारड्यात टाकले तर शारदेचे पारडे जड राहील! याचे प्रमुख कारण म्हणजे देवलांचे ते संपूर्णपणे स्वतंत्र नाटक आहे. त्यांच्या स्वतःच्या संवेदनाक्षम चिंतनशीलतेतून, स्फूर्तीच्या आवेगासरशी स्फुरलेले ते नाटक आहे. त्या नाटकावर `त्यांचाच संपूर्ण अधिकार आहे. अितर नाटकांच्या बाबतीत अलट परिस्थिती आहे. ती नाटकं संस्कृत वा इंग्रजी साहित्यावर आधारित, रूपांतरित, भाषांतरित अशी नाटकं आहेत. त्यामुळे नाही म्हटले तरी त्या कलाकृतीना थोडेसे गौणत्व प्राप्त होतेच. त्याहून महत्त्वाचे म्हणजे 'शारदा' हे सामाजिक नाटक आहे. यापूर्वीच्या नाटकातून ऐतिहासिक, पौराणिक, काल्पनिक कथानके असायची. त्या तुलनेत, आपल्या नेहमीच्या पाहण्यातील अनुभवातील माणसं नाटकात पात्ररूपाने भेटल्याने, प्रेक्षकांना अनपेक्षित सुखद आनंद मिळाला. वास्तविक 'शारदा' नाटकापूर्वी सामाजिक नाटके रंगभूमीवर अजिबात आली नव्हती असा प्रकार नव्हता. पण याच नाटकाला एवढे प्रचंड यश मिळाले की सामाजिक विषयावरील 'शारदा' हेच पहिले नाटक असं म्हणण्याचा प्रघात पडला! जरठकुमारी विवाहाचे आजमितीला महत्त्व नसले तरी १८९८-९९ च्या काळात, तो खळबळजनक वाटावा असाच विषय होता. एक श्रीमंत वृध्द गृहस्थ आपल्या श्रीमंतीच्या जोरावर, एका गरीब कन्येबरोबर विवाह लावू पाहतो आणि एक तरूण, बाणेदार तेजस्वी तरूण, हा बेत हर प्रयत्नाने हाणून पाडतो ह्या सूत्राभोवती नाटकाचे कथानक रचले आहे. या नाटकातील भुजंगनाथासारखा लंपट श्रीमंत, तोंडाने देवाचे नाव घेऊन कसाबाची करणी करणारा भद्रेश्वर, , पैशाकरता पोटच्या पोरीचा गळा कापणारा कांचनभट, गरीब गायीसारखी श्रीमंताच्या दावणीला बांधली जाणारी शारदा, तिची अगतिक आई इंदिराकाकू आणि लोककल्याणाची तळमळ बाळगणारा तेजस्वी तरूण कोदंड अशी रोजच्या समाज - जीवनातील पात्रे नाटकात दिसली म्हणून त्या पात्रांशी प्रेक्षकांची एक प्रकारे भावनिक जवळीक निर्माण झाली. सरळसाधे संवाद, सुभाषितवजा वाक्ये, रोजच्या बोलण्यातील म्हणी, वाक्प्रचार आणि अनलंकृत भाषा, नाटकाच्या विषयाला अनुरूप असल्याने प्रेक्षकांच्या अंत:करणाला थेट जाऊन भिडते. 'श्रीमंत पतीची राणी,' 'जय कृष्णतटवासा,' 'मूर्तिमंत भीती उभी, 'तू टाक चिरून ही मान' यासारखी कथेचा परिपोष करणारी


सांगली आणि सांगलीकर.................................................................... .३९