पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अथवा तसबिरीचा घोटाळा' या नावाचे एक गद्य नाटक रंगभूमीवर आणले. १८९४ मध्ये, शाहूनगरवासी नाटकमंडळीनी रंगभूमीवर आणलेल्या या नाटकात, गणपतराव जोशी अश्विनशेठची व बाळाभाऊ जोग रेवतीची भूमिका करत. पण हे नाटक फारसे चालले नाही.
 १८९४ मध्ये पुण्यात वास्तव्य करून राहात असलेल्या देवलानी, हरिपूर- सांगलीतच स्थायिक व्हायचे ठरविले. १८९७च्या सुमारास विलिंग्डन कॉलेजच्या (त्यावेळी कॉलेज नव्हते) बाजूच्या माळरानावर जमीन घेऊन एक मळा करवून घेतला आणि मळ्यातच राहण्यासाठी घर बांधून घेतले. आयुष्यभर मळ्यात घर बांधून राहण्याचे त्यांचे फार दिवसांचे स्वप्न होते. पण याच दरम्यान त्यांच्या आयुष्यातील एक दुर्दैवी घटना घडली. ती म्हणजे त्यांच्या प्रेमळ पत्नी राधाबाई यांचे दुर्दैवी निधन झाले. दुर्दैवी अशा अर्थाने की बाळंतपणाच्या वेळी, एका नर्सने चुकून त्याना औषधाऐवजी कॉरबॉलिक अॅसिड दिले. लक्षात आल्यावर मिरजेच्या हॉस्पिटलमधील डॉक्टरानी, विशेषत: डॉ. वॉनलेस सारख्या निष्णात डॉक्टरानी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण ते धनुर्वात झालेल्या राधाबाईना वाचवू शकले नाहीत. (७ डिसेंबर १८९७)
 प्रिय पत्नीचा मृत्यू देवलाना मोठा चटका लावून गेला. इतका की जसा त्यांचा संसार तिच्या निधनाने संपुष्टात आला. तसाच त्यांचा नाट्यलेखन संसारहि संपुष्टात आला.त्यानंतर त्यांच्या हातून फक्त एक अर्धवट लिहून तयार असलेले नाटक पुरे झाले आणि जवळजवळ वीस वर्षानंतर त्यांच्याच एका गद्य नाटकाचे संगीत नाटकात रूपांतर झाले.
 आपल्या हरिपुरात राहात असताना देवल संगमेश्वराच्या देवळाबाहेर कृष्णा- वारणेच्या संगमाजवळ जो एक पिंपळाचा पार आहे त्या पाराशी बसून चिंतनमग्न होत असत. त्याच सुमारास सांगलीचे अधिपती कै. तात्यासाहेब पटवर्धन यानी आपल्या वृध्दापकाळात एका लहान वयाच्या मुलीशी विवाह केला. असे विवाह समाजात बरेचदा होत असत. पण प्रत्यक्ष राजाने, प्रजेच्या पालनकर्त्यानेच, असा विवाह करण्याने, त्या घटनेचे पडसाद उमटले. कविमनाच्या देवलांच्या कानी त्या कुमारीचा आक्रोश किंकाळ्या फोडत गेला असावा. कारण अशा चिंतनमग्नतेतूनच ती निष्पाप कुमारिका जख्ख म्हाताऱ्याशी लग्न ठरल्यावर, आपल्या जन्मदात्या आईला काय म्हणाली असेल, याचा विचार देवलांच्या मनात चमकून, त्या अद्रेकासरशी त्यांच्या तोंडून “तू टाक चिरून ही मान! नको अनमान !” ही ओळ बाहेर पडली .!
 आणि मराठीमधील एका अमर नाटकाचा जन्म झाला !

 ते नाटक म्हणजे 'शारदा'. बायकोच्या मृत्यूआधीच या नाटकाचे काही प्रवेश


सांगली आणि सांगलीकर.......................................................... .३८