पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ही नाटके लिहावयास घेतली. त्यांपैकी मृच्छकटिक १८८७ मध्ये तर विक्रमोर्वशीय १८८९ मध्ये रंगभूमीवर आले.
 'मृच्छकटिक' नाटकाला मोठेच यश मिळाले. या यशाचे कारण म्हणजे शूद्रकाच्या या मूळ नाटकात कथानकाचे धागे प्रेक्षकांची आतुरता वाढवणारे आहेत. अितर संस्कृत नाटकांच्या तुलनेत पाल्हाळ कमी आहे. चारूदत्ताचे औदार्य, वसंतसेनेची गुणप्रियता, मैत्रेयाची स्वामिभक्ति, मित्रप्रेम, शकाराचा शहाणपणाचा वास असलेला दुष्टपणा, तर शर्विलक व रदनिका यांची प्रेमकथा, या अनेक गोष्टींमुळे कथानक रंगत जाते. मूळ नाटकातून काटछाट करत देवलानी नाटक सुटसुटीत (त्या काळाच्या मानाने) बनवले. अत्तम चाली, अभिनयसंपन्न नटवर्ग अणि खुद्द देवलानी मेहनतपूर्वक घेतलेल्या तालमी यामुळे या नाटकाचा बोलबाला खूप झाला. पुढे पुढे गंधर्वमंडळीनी थाटामाटाची सीनसिनरी करुन आणखी गंमत आणली. बालगंधवानी वसंतसेना आणि गणपतराव बोडसानी शकाराची भूमिका अजरामर करून टाकली.
 त्या तुलनेत देवलांचे ‘विक्रमोर्वशीय' नाटक अजिबात यश मिळवू शकले नाही. त्याचे अतिमानुष कथानक प्रेक्षकांच्या मनाला भावण्यासारखे नव्हतेच.
 देवलांचे एव्हाना पुण्यात बस्तान चांगले बसले. वृत्तीने नेमस्त असल्याने हरिभाऊ आपटे यांचेबरोबर त्यांचे चांगले मेतकूट जमले होते. न्यायमूर्ती रानडे यांच्या शिष्यपरिवारात जरी मोठ्या आस्थेने ते सामील झाले होते तरी एकूण सार्वजनिक जीवनातील धकाधकी त्याना मानवण्यासारखी नव्हती. पुण्यातील मित्रमंडळातील प्रो. वासुदेव बाळकृष्ण केळकर यांची मैत्री त्याना विशेष अपकारक झाली. ते इंग्रजीचे प्रोफेसर आणि शेक्सपीयरच्या नाटकांचे मर्मज्ञ होते. त्यांच्यामुळे इंग्रजी नाटकातील बारकावे देवलांना नीटपणे समजून घेता आले. याच मंथनातून देवलांच्या 'झुंजारराव' नाटकाचा जन्म झाला.

 'झुंजारराव' नाटक १८९० मध्ये प्रसिद्ध झाले. शेक्सपीयरच्या 'ऑथेल्लो' या जगप्रसिध्द शोकांतिकेचे रुपांतर म्हणजे देवलांचा झुंजारराव हे भाषांतर नाही तर रूपांतर असल्याने एतद्देशीय परिस्थितीला अनुसरून जुळणी देवलानी केली. ऑथेल्लो आणि इयागोचे झुंझारराव आणि जाधवराव झाले. डेस्डिमोनाची कमळजा झाली. ज्या कुणा महाभागाला शेक्सपीयरची मूळ कलाकृती माहीत नसेल त्याला हे नाटक म्हणजे स्वतंत्र कलाकृतीच वाटेल! मुळात कथानक, व्यक्तिरेखा या दृष्टीने शेक्सपीयरची ही कलाकृती अमर असल्याने आणि नाटक रूपांतराच्या साया मख्ख्या देवलाना अत्तम प्रकारे अवगत असल्याने हे नाटक रंगभूमीवर बरीच वर्षे गाजले. गणपतराव जोशी यानी झुंझाररावाची भूमिका आणि बाळाभाऊ जोग यानी इयागोची भूमिका


सांगली आणि सांगलीकर.................................................................. .३६