पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

या साऱ्या गोष्टींना खतपाणी घातले होते. त्यामुळे गुरू-शिष्याची जोडी एकत्रितपणे काम करू लागली. अण्णांच्या संगीत 'शाकुंतल' नाटकात मूळात शकुंतलेच्या तोंडी पदे नव्हती. कारण शकुंतलेचे काम करणाऱ्या शंकरराव मुजुमदाराना गाण्याचे अंग नव्हते. पुढे भाऊराव कोल्हटकर कंपनीत आले. त्याना गाण्याचे अंग असल्याने शकुंतलेसाठी पदे घालण्याचे ठरले. अण्णासाहेबानी हे काम देवलांकडे सोपवले. आणि अण्णांच्या पदरचनेबरहुकुम पदे तयार करुन, देवलानी सर्वांची वाहवा मिळविली. शकुंतला व सुभद्रा या दोन्ही भूमिकांचे अभिनयशिक्षण देऊन, ही दोन्ही कामे भाऊरावांकडून चोख वठवून घेण्याची मोठी जबाबदारी देवलानी समर्थपणे पार पाडली. पुढे अण्णासाहेबांच्या 'रामराज्यवियोग' नाटकात भाऊरावांकडून मंथरेची व भास्करबुवा बखले याजकडून कैकयीची भूमिका त्यानीच बसवून घेतली.
 मात्र अण्णासाहेबांच्या मृत्युनंतर किर्लोस्कर संगीत मंडळींबरोबरचे देवलांचे संबंध संपुष्टात आले. अण्णासाहेबाना असलेले स्थान आपल्याला मिळावे अशी त्या नाटकमंडळींकडून देवलांची रास्त अपेक्षा होती असा प्रवाद आहे. देवलांच्या अंगी असलेले नाट्याविषयक ज्ञान आणि काव्यप्रतिभा यामुळे तसे स्थान त्याना मिळायला हरकत नव्हती. तसे घडले नाही हे मात्र खरे. देवलांचा स्वत:चा तापटपणा आणि मानी स्वभावही आडवा आला असेल!
 ते काही असो. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सहवासाचा, मार्गदर्शनाचा फार मोठा प्रभाव देवलांवर पडलेला होता. १८८५ मध्ये अण्णासाहेबांचा मृत्यू झाल्यावर देवलानी अत्स्फूर्त आर्या रचली. ती अशी :-

बलवत्-कवि - कविता - मधुमधुपासम रसिक रसिक जे प्याले ।
वदतील माधुरी ती ससित पयाचे न देति शत प्याले ॥१॥
बलवत् कवि ही भरत मुनीचीच मूर्ति अवतरली ।
जिच्या अनुमान कृतिने नाट्यकला अज्ञ ताप ती तरली ॥२॥

 अनेक ठिकाणी देवलानी अण्णासाहेबांविषयीचा आपला प्रेमभाव व्यक्त केला आहे. ‘शापसंभ्रम' नाटकाच्या नांदीमध्ये त्यानी आपल्या गुरुला वंदन केले आहे ते असे.......

'श्रीनटनायक चिंतुनी आधी, बलवंता नमितो ।।
दुष्कर कामी प्रसाद गुरुचा धैर्य मना देतो ॥”

आण्णांच्या शाकुंतलचे यश बघून संस्कृत वाङमयातील कथानकांवरून नाटके रचण्याची वा रूपांतरित करण्याची प्रेरणा देवलाना मिळाली आणि याच अर्मीतून १८८६-८७ नंतर म्हणजे अण्णासाहेबांच्या मृत्युनंतर देवलानी 'मृच्छकटिक' आणि 'विक्रमोर्वशीय'


सांगली आणि सांगलीकर.............................................................. .३५