पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
स्वागत

 श्री. अविनाश टिळक हे मूळचे सांगलीचे. मध्यंतरी ते नोकरीच्या निमित्ताने अनेक वर्षे मुंबईत होते. निवृत्तीनंतर कांही वर्षापूर्वी ते सांगलीत येऊन स्थायिक झाले आहेत. त्यानंतर त्यांनी आपल्या साहित्यिक व सांस्कृतिक कामाची सुरवात नव्या जोमाने सुरु केली आहे. त्यांचे वडील कै. रा. वा. टिळक, 'टिळक मास्तर' म्हणून ओळखले जात. त्यांना वाचनाचा अतोनात हव्यास होता, वेडच होते. ते नगरवाचनालयाचे अविभाज्य सदस्य वाचक होते. किंबहुना वाचन हाच त्यांचा व्यवसाय होता. पेशाने ते शिक्षक होते इतकेच. आपले हे वेड त्यांनी दुसऱ्या पिढीत संक्रांत केले आहे. श्री. अविनाश टिळक हे त्याचे ठळक प्रतीक आहेत. म्हणूनच तेही वाचनालयाचे सक्रिय कार्यकर्ते व वाचन लेखनात रस घेणारे निर्मितीक्षम रसिक म्हणून सांगलीत ओळखले जातात. त्यांच्या नावावर ‘आधारवड' नावाचा एक अतिशय निष्ठापूर्ण चरित्र ग्रंथ आहे. तो त्यांच्या वाङ्मयीन प्रवृत्तीची व क्षमतेची साक्ष देण्यास पुरेसा आहे. त्यांची लेखन शैली जुन्या नव्या पद्धतीचे रोचक दर्शन घडविणारी आहे. सांगलीबद्दलच्या त्यांच्या प्रेमाने 'सांगली व सांगलीकर' हा परिचय ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा त्यांना मिळाली व तो ग्रंथ त्यांनी प्रेमाने व परिश्रमाने सिद्ध केला आहे. पुस्तकामागील मनोभूमिकेत ते लिहितात " ३५ वर्षांच्या दीर्घकालीन विरहात सांगलीची आठवण माझ्या मनात एकाद्या प्रेयसीच्या आठवणीसारखी ताजी होती” मुंबईच्या वैभवात लोळताना देखील त्याना हरिपूरच्या जत्रेची, तात्यासाहेबाच्या मळ्यातील हिरव्या पाण्यात मारलेल्या उड्यांची, वडावर रंगलेल्या सूरपारंब्याची, नगरवाचनालयातील ऐतिहासिक कादंबऱ्यात हरवलेल्या ध्यानाची, विवेक हजारे, विजय भोसले या क्रिकेटपटूंची आठवण येत असे. नंतर अन्यक्षेत्रांतील नामवंत, सांगलीचे सुपुत्र आहेत याचा त्याना अभिमान वाटत असे. आद्य नाटककार विष्णुदास भावे, देवल, खाडिलकर, साधुदास, वि. स. खांडेकर, वैद्य आबासाहेब सांभारे, उद्योगरत्न दादासाहेब वेलणकर, बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर, वसंतदादा पाटील ही मंडळी तेंव्हा त्यांच्या नजरेसमोर येत. सांगलीकर कोणास म्हणावे याचा निर्णय त्यांनी स्वतः घेतला. ज्या व्यक्तीमुळे सांगलीचे नाव उज्ज्वल झाले तो सांगलीकर. अशा बावीस सांगलीकरांची निवड त्यानी केली. आणखी काही सांगलीकरांची नावे त्यांच्या दृष्टीसमोर आहेत.

एक