पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सुरूवात केली. पण हा व्याप काही देवलाना झेपला नाही. मासिक लौकरच बंद पडले. मग काही काळ वर्तमानपत्रात लिहून बघितले. 'पुणे वैभव' या पत्रात काही प्रचलित विषयांवर त्यानी लेखन केले. त्या काळी गाजलेल्या 'क्रॉफर्ड' प्रकरणावर 'गरीब रयतेचे काळ' या त्यांच्या लेखाबद्दल संपादकाना माफी मागावी लागली. मग मात्र देवलानी ठरविले की आता नोकरी नाही की अन्य अद्योग नाही.
 आता फक्त नाट्यव्यवसाय !
 त्यांच्या सुदैवाने एक संधी त्यावेळी चालत आली.
 त्यावेळचे राजाराम कॉलेजचे प्रिन्सिपॉल कँडी यानी त्याच त्याच नाटकांचा पुन्हा पुन्हा प्रयोग होतो, तेव्हा नवीन नाटक लिहिले जावे म्हणून एक नाट्यलेखनस्पर्धा आयोजित केली. पहिल्या नाटकास रु. १५१/- चे बक्षिस ठेवले. तेव्हा देवलानी आपले पहिले नाटक 'दुर्गा' लिहिले आणि स्पर्धेसाठी पाठवले. हे नाटक म्हणजे टॉमस सदर्नच्या The Fatal Marriage or The Innocent Adultery या नाटकाचे रूपांतर आहे. 'दुर्गा' हे ६४ पानी शोकान्त नाटक आहे. दुर्गा नावाच्या स्त्रीचा नवरा मारला गेल्यावर (म्हणजे तशी बातमी प्रसृत झाल्यावर) ती स्त्री, तिच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या पुरूषाशी लग्न करते आणि दुर्दैवाने त्याचवेळी तिचा पहिला नवरा परत येतो. या नाटकात एकप्रकारे पुनर्विवाह दाखवला असताना, १८८५-८६ च्या सनातनी काळात हे नाटक रंगभूमीसाठी देवलानी लिहावे, हे थोडे आश्चर्याचे आहे. या शोकान्तकारी नाटकाच्या बक्षिसाची पण थोडी शोकान्तिकाच झाली. देवलांच्या 'दुर्गा' नाटकाचे बक्षिस जवळजवळ निश्चित झाले होते. पण एकूण ३५ हस्तलिखितांपैकी कै. वासुदेवशास्त्री खरे यांचे 'गुणोत्कर्ष' नाटक वाचायचेच राहून गेले असे शेवटच्या क्षणी परीक्षकांच्या लक्षात आले! आणि ते नाटक वाचल्यावर 'गुणोत्कर्षला' पहिले बक्षिस देण्यात आले! मात्र 'दुर्गा' नाटकाची पण परीक्षकानी वाखाणणी केल्यामुळे प्रिन्सिपॉल कँडीनी त्या नाटकास रू.७५/- चे खास बक्षिस दिले.
 यासंबंधीच्या अलट-सुलट बातम्या 'केसरी' च्या स्फुटात येत होत्या. पुस्तकरूपाने हे नाटक १८८६ मध्ये प्रसिद्ध झाले. देवलानी स्वतः हे नाटक बसवले आणि रंगभूमीवर त्याला बऱ्यापैकी यश मिळाले. नाट्यव्यवसायात स्थिर होण्यास 'दुर्गा' नाटक अपकारक ठरले.

 यानंतर देवल, अण्णासाहेब किर्लोस्करांच्या किर्लोस्कर नाटक मंडळींबरोबर काम करू लागले. म्हणजे अण्णासाहेबानी त्याना बोलावूनच घेतले. बेळगावच्या शाळेत विद्यार्थीदशेतील देवलांचे काव्यप्रेम, काव्यक्षमता, नाट्यवेड, नाटकाच्या बारीक- सारीक अंगांचे सूक्ष्म ज्ञान यांचा अण्णांना जवळून परिचय होता किंबहुना त्यानीच


सांगली आणि सांगलीकर.................................. ३४