पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाटकाची परंपरा निर्माण झाली होती, तिने गोविंदरावांच्या मनाचा वेध घेतला असावा. तिचे आकर्षण त्याना वाटले असावे. त्याचमुळे नाट्यलेखनाची ऊर्मी त्यांच्या मनात अंकुरली असावी. विष्णुदासांची पौराणिक नाटके ऐन बहरात होती. त्याकाळात 'सांगलीकर' या नावाच्या दोन नाटकमंडळ्या होत्या. एक धोंडोपंत मराठे यांची तर दुसरी श्रीपादपंत लेले यांची. या मंडळींचे नाटकाचे प्रयोग सांगलीत धुमधडाक्याने होत असत. त्यातच हरिपूरच्याच बळवंत भास्कर मराठे या तरूणाने स्वत:चीच एक नाटकमंडळी स्थापन केली होती. या साऱ्या गोष्टींचा परिणाम गोविंदराव देवलांची नाट्यअभिरूची वाढण्यात झाला असावा. या काळात हरिपुरात ते स्वस्थ बसून असावेत असे त्यांच्या चरित्रकारांच्या कथनावरून वाटते. देवलांचे प्राथमिक शिक्षण हरिपुरातीलच बंडोपंत लेले या पंतोजींकडे झाले. त्यानंतर त्यांचे बंधू कृष्णाजीपंत याना नोकरी लागून त्यांचे बेळगावी बिऱ्हाड झाले तेव्हा देवलांचे इंग्रजी शालेय शिक्षण तेथे सुरु झाले. पण दरम्यानच्या काळात नाटक या विषयाचा त्यानी सर्वांगाने अभ्यास केला असावा. त्यांच्या त्या बालवयातील या नाट्यअद्योगाला अभ्यास म्हणणे योग्य नाही पण नाट्यवस्तु, अभिनय, संगीत, प्रवेश (त्याकाळात 'कचेरी' म्हणत) मग रंगत जाणारे अंक, या सर्व गोष्टींचे त्यानी जे अवलोकन केले, त्याचा भावी काळात त्याना फार अपयोग झाला. एकूण नाट्यकलेचा अंकूर या बालवयातच त्यांचे ठायी रुजला.

 बेळगावमध्ये सरदार्स हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय (हायस्कूल) शिक्षण झाले. मध्यंतरी कदाचित वडील बंधूंच्या बदलीमुळे ते पुन्हा कोल्हापुरात राजाराम हायस्कूलमध्ये शिक्षणासाठी दाखल झाले. बेळगावच्या सरदार्स हायस्कूलमधून १८७८- ७९ मध्ये ते मॅट्रिक झाले. सरदार्स हायस्कूलमधील मोठी कमाई म्हणजे त्याना झालेला कै. अण्णासाहेब किर्लोस्करांच्या सहवासाचा लाभ. अण्णासाहेब त्याना सरदार्स हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून लाभले. मूळची नाटकाची आवड, नाटककारच शिक्षक म्हणून लाभल्याने आपोआपच परिपक्व झाली. पण अण्णासाहेबांच्या मार्गदर्शनाचा खरा परिणाम देवलांच्या काव्यलेखनावर झाला. मुळात त्याना काव्याची आवड होतीच पण अण्णांच्यामुळे त्यांच्या काव्यरचनेस नक्कीच प्रोत्साहन मिळाले. मंगळागौरी, हरतालिका, व्रतबंधन अशा कार्यक्रमांस ते कविता करून देत. त्यांच्या संवेदनाक्षम मनाला सामाजिक दुष्ट रुढींमुळे स्त्रियांचे होणारे हाल याच काळात जाणवावयास लागले असावेत. कारण सामाजिक विषयावरील 'सासुरवाशीण' ही त्यांची कविता खूप गाजली होती. म्हाताऱ्या नवऱ्याशी लग्न झालेल्या तरूण सासुरवाशिणीच्या छळाचे वर्णन त्यात अगदी प्रत्ययकारी झाले आहे. त्यातील काही शेवटची कडवी अशी :


सांगली आणि सांगलीकर............................................................. ३२