पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
नाट्यसेवेला सर्वस्व मानणारे
नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल



 महाराष्ट्राच्या नाट्य- अतिहासातील पहिल्या पाच प्रमुख मराठी नाटककारांपैकी तीन नाटककार सांगली गावातील असावेत ही किती अभिमानाची बाब आहे! मराठी नाट्यसृष्टीचे जनक विष्णुदास भावे, खऱ्या अर्थाने ज्याना नाट्याचार्य म्हणता येईल असे गोविंद बल्लाळ देवल व कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर ही तीन दैवते म्हणजे सांगलीकरांसाठी नाट्यक्षेत्रातील ब्रह्मा विष्णू महेशच ! विष्णुदासानी मराठी रंगभूमीची स्थापना केली पण त्याचबरोबर नाट्यक्षेत्राहून भिन्न असे अनेक व्यवसाय त्यानी केले.खाडिलकरानी नाट्यव्यवसायाच्या बरोबरीने किंबहुना अधिकच असा पत्रकारितेचा व्यवसाय केला. याउलट देवलानी केवळ नाटक हेच आपले जीवितकार्य मानले. चरितार्थासाठी म्हणून नोकरी केली पण ती सुध्दा अल्पकाळ. एरवी नाट्यलेखन आणि नाट्यशिक्षण यामध्येच आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले.
 नाट्याचार्य गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म, सांगली गावाच्या नैऋत्येस असलेल्या अडीच मैलांवरील हरिपूर गावात १३ नोव्हेंबर १८५५ रोजी झाला. हरिपूर गाव कृष्णा नदी व वारणा नदी यांच्या संगमावर आहे. शेजारीच संगमेश्वराचे मंदिर असल्याने या गावास तीर्थक्षेत्राचे महत्त्व आहे. पटवर्धन संस्थानापैकी मिरजमळा (बुधगाव) संस्थानच्या हद्दीत हे गाव होते. गोविंदरावांचे वडील बाळाजीपंत हे बुधगावकर राजेसाहेबांच्या नोकरीत होते. सरकारी कुरणांवर देखरेख करण्याचे त्यांचे काम असे. त्याबद्दल त्याना दरमहा रु.३/- एवढा पगार होता! गोविंदराव देवलाना कृष्णाजीपंत व रामभाऊ असे दोन थोरले बंधू होते. तत्कालीन सांगलीकरांप्रमाणे पोहण्याची खास आवड गोविंदरावाना होतीच. थोरले बंधू कृष्णाजीपंत हे मोठे कर्तबगार गृहस्थ होते. रेव्हेन्यू खात्यात कारकुनी करता करता अखेर कृष्णाजीपंत हुजूर डेप्युटी कलेक्टर म्हणून निवृत्त झाले. ते संगीतशात्राचे जाणकार होते. त्यानी 'फिलहार्मानिक सोसायटी' नावाची संस्था स्थापन केली व शास्त्रोक्त बावीस श्रुतींच्या वाद्यांचा प्रसार केला. मधले बंधु रामभाऊ, 'इचलकरंजीकर' नाटक मंडळीत नावाजलेले नट होते. कदाचित या पार्श्वभूमीमुळेच संगीत आणि नाट्य या दोहोंचे गोविंदरावांवर कळत नकळत संस्कार झाले असावेत.

 याहुन महत्त्वाचे म्हणजे जवळच्याच सांगलीत विष्णुदास भावे यांच्यामुळे


सांगली आणि सांगलीकर................................................................... .३१