पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 नाटकांचे प्रयोग चालू असताना शिकवून तयार केलेले नट अचानक सोडून जात. त्याचा विष्णुदासांना त्रास होई. अशी जिवंत माणसं त्रास देणारी आहेत तर आपण 'निर्जीव' वस्तूंपासून काही करुन घेऊ शकतो का? असं काही करुन पाहण्याची अर्मी त्यांच्या मनात निर्माण झाली. किती विलक्षण जिद्द! त्यांच्या नेहमीच्या अद्योगी स्वभावानुसार ते या कल्पनेच्या पाठपुराव्यास लागले. यातूनच जिवंत हाडामासांच्या नटांवर अवलंबून न राहता, आपण काष्ठांकडून नाट्यसेवा घडवून घेऊ अशी हिंमत धरून त्यानी कळसूत्री बाहुल्या तयार केल्या. या खेळासाठी ज्या बाहुल्या त्यानी तयार केल्या त्याचे हातपाय, तोंड, मान, डोळे, ओठ, अितकेच काय पण बोटांची पेरी वगैरे अवयवसुध्दा नैसर्गिकरीत्या हालविण्याची अपूर्व कल्पकता त्यानी दाखविली. सूत्रे हालविणारा एकच माणूस सर्व पात्रांची भाषणे, वेगवेगळ्या आवाजात (स्त्री- पुरुष पात्रानुसार) करी. त्यामुळे अनेक पात्रे बोलत असावीत असा मोठा शब्द चमत्कार किंवा शब्दभ्रम विष्णुदासानी निर्माण केला.
 आजच्या काळात बाहुल्यांचा खेळ करून अत्यंत लोकप्रिय झालेल्या श्री. रामदास पाध्ये यानी विष्णुदास भावे यांचे ऋण मान्य केले आहे. ३१ ऑक्टोबर १९९२ च्या रविवारच्या 'लोकसत्ते' त विष्णुदासांच्या या क्षेत्रातील कामगिरीचा त्यानी मोठा गौरव केला आहे. त्यानी विष्णदासांच्या बाहुल्यांची अनेक वैशिष्ट्ये सांगताना म्हटलं आहे की त्यांच्या प्रत्येक बाहुलीला स्वतंत्र व्यक्तिमत्व होतं. रंगभूमीवर जी भूमिका असेल त्याला अनुरूप अशीच बाहुलीची बांधणी असे. या बाहुल्या संपूर्णपणे लाकडाच्या बनवलेल्या असत. त्यासाठी वजनाला हलके असे अंबराचे लाकूड ते वापरत. या सर्व बाहुल्या विष्णुदासानी स्वतः हाताने बनवलेल्या होत्या. दुर्दैवाने १९४८ मध्ये जाळपोळ झाली त्यामध्ये बऱ्याचशा बाहुल्या आगीमध्ये भस्मसात झाल्या. अलीकडेच, जुलै २००० मध्ये यापैकी कांही बाहुल्याना रंगरंगोटी, वेषभूषा करून मुंबईचे सुप्रसिद्ध शब्दविभ्रमकार, श्री रामदास पाध्ये यांनी विष्णुदासांचे "द्रौपदी स्वयंवर" हे नाटक सादर केले.
 आजच्या जमान्यात दूरदर्शनवरील बोलक्या बाहुल्यांचा शब्दभ्रम ऐकूनही स्तिमित होणारी आम्ही माणसं ! मग शंभर, सव्वाशे वर्षापूर्वीच्या काळात अशी 'करामत' करता येत असेल तर त्या विलक्षण पुरुषाला 'विश्वकर्मा' म्हणायचे का आणखी काही?
 असा हा 'मुलुखावेगळा माणूस' सांगलीत वारंवार अद्भवणाऱ्या प्लेगच्या साथीला बळी पडून ९ ऑगस्ट १९०१ रोजी मृत्युमुखी पडला.
 एखाद्या सर्वसामान्य हरहुन्नरी माणसाचे एरवी एवढं कौतुक वाटलं नसतं पण हा माणूस ‘महाराष्ट्राचा आद्य नाटककार' म्हणून ते कौतुक अधिकच गहिरं बनतं.

 आणि असा हा 'महाराष्ट्राचा भरतमुनी' सांगलीचा होता म्हणून प्रत्येक नाट्यप्रेमी सांगलीकराच्या भावना अचंबळून येतील यात शंका नाही!

●●●


सांगली आणि सांगलीकर............................................................३०