पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वेळोवेळी काही संस्थानी कामे त्यानी केली. आजच्या गणपतीमंदिराच्या मागील बाजूस श्रीमंत स्वारीसाठी म्हणून जी निवासस्थाने बांधण्यात आली त्याचे 'बिल्डिंग सुपरवायझर' विष्णुपंत होते. सांगलीकरांकडे जो लग्नसोहळा झाला त्यावेळी लग्नाचा मंडप अभारणीपासूनची सर्व देखरेख त्यांची होती.
 जमखंडी संस्थानातील बंगले, देवीचे देऊळ, शाळा, दवाखाना व इतर अलिशान इमारतींचे काम विष्णुदासांच्या देखरेखीखाली झाले. जमखंडीच्या वास्तव्यात चिनी मातीचे खुजे व बरण्या बनविण्यास योग्य अशी माती त्याना आजूबाजूला आढळली. मग विष्णुदासानी काय करावे? तसे खुजे व बरण्या त्यानी चक्क बनविल्या. त्यावर ग्लेझिंग केले. तेव्हा असा एक कारखाना घालण्याचीच तयारी त्यानी चालविली. पण जमखंडीकरानी अनुकूलता दाखवली नाही म्हणून त्यांचा हा बेत बारगळला!
 नंतर कोल्हापूरला कळंबा तलावाच्या कामावर काही काळ त्यानी काम केले. पुढे डिसुझा नावाच्या ख्रिश्चन माणसाच्या नादाने विष्णुदास हैदराबादला गेले. तेथे कौले, विटा बनविण्याच्या कारखान्यात त्यानी काही दिवस काम केले. श्री. गणेश नारायण कर्वे या गृहस्थाच्या निमंत्रणावरुन विष्णुदासानी वयाची सत्तरी पार केल्यावरच्या वृध्दापकाळात, ग्वाल्हेरकडे कूच केले. तिथे या कर्त्याना नाटककंपनी काढायची होती म्हणून त्याना मदत केली. त्यावेळी श्री. कर्वे याजकडे कसला तरी अत्सव होता म्हणून विष्णुदासानी त्याना एक देवतेची मूर्ती बनवून दिली. ही मूर्ती एवढी देखणी बनली की अक्षरशः अख्खं ग्वाल्हेर ती मूर्ती पहाण्यासाठी लोटलं. ही करामत आणि नाट्यक्षेत्रातील त्यांची अद्भुत कामगिरी ग्वाल्हेरच्या महाराजांच्या कानावर गेली. मग जयाजीराव शिंदे सरकारनी त्याना मानाने बोलावून त्यांचा सन्मान केला. शिंदे सरकाराना पाहिजे तसली मूर्ती विष्णुदासानी बनवून तर दिलीच पण त्यांच्या बागेसाठी एक रहाटगाडगेहि बनवून दिले!
 या हकीगती वाचून या माणसाच्या विलक्षण बुध्दीमत्तेची कल्पना येते की नाही ? हे अद्योग कमी पडले म्हणून की काय शेवटच्या अतारवयात घरच्या घरी झाडांची पाने अणि फुले यांपासून रंग अत्पन्न करण्याचे त्यांचे प्रयोग चालू होते. तरुण वयात शेती करुन बघितली होतीच. म्हातारपणी आपल्या अंगणातील 'प्रयोगशाळेत ' 'इनक्लाइंड प्लेन' वर केवळ वजनाच्या योगाने दोन मोटा चालणारे यंत्र तयार करण्याचा त्यांचा खटाटोप चालू होताच!
 खरोखर हरहुन्नरी विष्णुदासांच्या अंगी किती कला होत्या याची झलक पाहूनच आश्चर्याने तोंडात बोट जाते !

 पण या माणसाला 'विश्वकर्मा' म्हणायचा मोह व्हावा अशी आणखी एक विलक्षण गोष्ट त्यानी केली होती. ती म्हणजे कळसूत्री बाहुल्यांचा खेळ.


सांगली आणि सांगलीकर..................................................................... .२९