पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 पुण्याहून पुढे ही नाटकमंडळी मुंबईस गेली. तेथेहि नाटकगृहे नव्हती. इंग्रजी नाटके होत त्या ग्रँटरोड थिअटरला पाचपाचशे रु. भाडे असे. त्यामुळे विष्णुदास फणसवाडी, ठाकुरद्वार येथे मांडव घालून नाटके करीत. मराठी नाटक हा करमणुकीचा अभिनव प्रयोग असल्याने मुंबईकराना खूप अप्रूप वाटले. मग तेथील पारशी, गुजराथी, युरोपियन लोकाना मराठी नाटक समजणार नाही म्हणून मुंबईच्या मुक्कामातच 'गोपीचंद' नाटक हिंदी भाषेत लिहून ताबडतोब त्याचा प्रयोग सादर केला. म्हणजे हिंदी नाट्यसृष्टीचे जनक म्हणून विष्णुदासांचेच नाव घ्यावे लागते. त्या नाटकाला अभूतपूर्व गर्दी होऊन त्या काळात १८००रुपयांची विक्रमी तिकिटविक्री झाली. मुंबईच्या धनिक गुजराथी लोकानी पैशाची भरपूर अधळण केली. डॉ. भाऊ दाजी लाड यांच्या मध्यस्थीने, गव्हर्नरसाहेबांच्या सेक्रेटरीने विलायतेस नाटक कंपनी नेण्याचे सुचवले. पण धर्माज्ञेचे अल्लंघन होईल म्हणून विष्णुपंतानी ही सूचना नाकारली.
 १८६२ पर्यंत विष्णुपंतानी अशा तीन स्वाऱ्या केल्या. यशस्वी केल्या. स्वतःला आणि अितरांना आर्थिक सुबत्ता मिळवून दिली. श्रीमंत आप्पासाहेबांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या नाटक मंडळींची जी दैना झाली त्यातून सर्वजण सावरले. चार पैसे सर्वांच्या खिशात खुळखुळू लागले. विष्णुदासानी नाटकाचा एक धन व कीर्ती मिळवणेचा धंदा महाराष्ट्राला नव्याने मिळवून दिला.
 आणि मग मात्र महाराष्ट्रात जे नेहमी होते तेच झाले.
 त्यांच्या नाटकमंडळीतील अनेक नटानी वेगळ्या कंपन्या स्थापन केल्या. राहिलेल्या मंडळींत भांडणे सुरू झाली. त्यामुळे नवीन काही नाटके लिहावीत, खटाटोप करुन बसवावीत अितकी मनाची अमेद, वैतागून गेलेल्या विष्णुदासाना राहिली नाही. कंटाळून विष्णुदासानी नाटक धंद्यास रामराम ठोकला.
 महाराष्ट्राचे आद्य नाटककार म्हणून त्यांची कारकीर्द संपली. पण विष्णुदासांचे अर्वरित जीवन खरोखर ते विलक्षण अद्भुतरीत्या जगले, म्हणून मुद्दाम अद्धृत करावेसे वाटते.
 यानंतरच्या काळात विष्णुदासानी जमखंडी, कोल्हापूर, हैदराबाद अशा विविध ठिकाणी विविध कामे केली. नंतर त्यांची अडी अत्तर हिंदुस्थानात ग्वाल्हेरपर्यंत गेली! एवढ्या काळात या नाटककाराने काय काय अद्योग केले पहा.

 सांगलीकर राजेमंडळींबरोबर आप्पासाहेबांच्या निधनानंतर कायम तैनात मिळण्याच्या दृष्टीने विष्णुदासांचे फारसे जमले नाही. दरबारी राजकारणे आणि त्यांचा स्वतःचा फटकळ स्वभाव, स्पष्टवक्तेपणा यांचे फारसे सूत जमले नाही. पण


सांगली आणि सांगलीकर................................................................. २८