पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

एवढा आवडला की संस्थानला भेट द्यायला मोठा पाहुणा आला की लागलीच विष्णुपंतांच्या नाटकाचे प्रयोग होत. सुरुवातीला नाटक हा शब्द लोकांमध्ये फारसा रुढ झाला नव्हता. सगळा रामायणाचा कथाभाग म्हणून लोक 'राम अवतारी खेळ' असे म्हणत !
 श्रीमंताच्या सूचनेनुसार विष्णुपंतानी इतर कथानकांवर 'कृष्णजन्म' 'अत्तर- गोग्रहण' अशी नाटके रचली. विष्णुपंतांची एकूण बुद्धिमत्ता, त्यांच्या कर्तबगारीचा आ बघून श्रीमंत, त्यांच्या नाटकमंडळींकरता कायमस्वरूपी इनाम जमिनी देण्याच्या विचारात होते.
 पण खुद्द श्रीमंतच आजारी पडले व त्यातच त्यांचा अंत झाला. (१८५१)
 आता मात्र विष्णुपंतांचे ( आता ते विष्णुदास झाले होते. नाटकातील पद्यात त्यानी आपला निर्देश 'विष्णुदास' या नावाने करायला प्रारंभ केला होता.) दिवस फिरले. श्रीमंत आप्पासाहेबांच्या निधनानंतर, गादीवर बसलेले श्रीमंत तात्यासाहेब अल्पवयीन असल्याने, सर्व कारभार पोलिटिकल एजंटाच्या हातात होता! बाकी कुणाची सहानुभूती नव्हती. डोक्यावर नाटकाच्या खर्चाचा बोजा मात्र हकनाक बसला. सरकारातून कर्जफेडीस मदत होईना. या घालमेलीतून बाहेरगावी दौरे करायचा विष्णुदासानी विचार केला.
 आज जसे आपण नाटकमंडळी दौऱ्यावर निघाली म्हणतो तसे त्या काळी 'स्वारीवर' निघाली असे म्हणत.
 प्रवासास लागणारी भांडीकुंडी, अंथरूणे-पांघरुणे, नाटकाचे साहित्य (प्रॉपर्टी) वगैरे घेऊन १८५२ मध्ये विष्णुदास 'पहिली स्वारी' करण्याकरता सांगलीबाहेर पडले.
 तासगाव, मिरज, कागवाड, जमखंडी, मुधोळ, कोल्हापूर अशा अनेक गावांतून प्रयोग झाले. बरेच प्रयोग होऊन खर्च वजा जाता विष्णुदास नाटक मंडळीला बऱ्यापैकी पैसा, कपडालत्ता मिळाला. या अत्पन्नामधून मंडळींजवळ नाटकी संच, स्वतःचे अंची कपडे झाले.

 पहिल्या स्वारीतून स्फूर्ती घेऊन विष्णुदासानी १८५३मध्ये दुसरी स्वारी (दौरा ) आरंभली. कऱ्हाड, सातारा, फलटण, बारामती करुन मंडळी पुण्यात आली. पुण्यात बुधवार चौकात, आंबेकराच्या बोळातील, सांगलीकरांच्या वाड्यात मांडव घालून नाटकांचे प्रयोग होऊ लागले. पुण्यात प्रो. केरोपंत छत्रे, कृष्णशास्त्री चिपळूणकर, वगैरे मंडळीनी वाहवा केल्याने बऱ्यापैकी पैसा मिळाला. पुण्यास नाटकवाली मंडळी अशी प्रथमच आली होती.


सांगली आणि सांगलीकर......................................................... .२७