पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समजतील अशी नाटकाची पदे त्यानी स्वतः लिहून काढली ! गाण्या - बजावण्याचा पूर्वीचा छंद त्यांच्या अपयोगी पडला. रागदारी- मिश्र कविता करुन सूत्रधाराची कामे करणाऱ्याना चांगली स्वरतालावर म्हणण्यास शिकविली.
 थोडक्यात आजच्या भाषेत म्हणजे विष्णुपंत या नाटकाचे 'सबकुछ' होते!  श्रीमंत राजेसाहेबानी या नाटकाच्या कामाकरिता एक वेगळीच इमारत बांधून दिली होती. तिथंच ह्या नाटकाची अभारणी व तयारी झाली.
 याप्रमाणे सर्व सिद्धता झाल्यावर १८४३ साली श्रीमंत राजेसाहेब व त्यांच्याबरोबरची निवडक मंडळी यांच्यासमोर मराठी रंगभूमीवरच्या पहिल्या नाटकाचा प्रयोग झाला. या ऐतिहासिक घटनेच्या मागे विष्णुपंतांचे जे परिश्रम होते त्याला खरोखर तोड नव्हती.
 या पहिल्या नाटकाचे नाव होते 'सीतास्वयंवर'. पात्रांची सजावट, निवड व सुरस कथाभाग यामुळे प्रयोग चांगला वठला. श्रीमंत खूष झाले. त्यानी विष्णुपंतांची खूप वाहवा केली. भागवत मंडळींच्या बीभत्स धांगडधिग्याच्या पार्श्वभूमीवर हे नाटक सर्वाना आवडले.
 या यशानंतर एक गंमत झाली. थोड्याशा धार्मिक कारणाने म्हणा वा मत्सरापोटी म्हणा, विष्णुपंतावर व इतर नटवर्गावर बहिष्कार पडला! ही मंडळी आली की सर्वजण अठून जात. “नटवेष घेणे ही गोष्ट धर्मबाह्य आहे, सबब त्यांजशी कोणी पंगती व्यवहार करु नये” असा प्रचार सुरु झाला. शेवटी श्रीमंत राजेसाहेबानी विद्वान, शास्त्री - पंडित, सभ्य प्रतिष्ठित अशा लोकांची सभा बोलावली. सभेत वे.शा. आप्पाशास्त्री साठे, आगाशे अशा मंडळीनी जुन्या ग्रंथांचे आधार दाखवून नटवेष घेणे कसे दोषास्पद नाही याचे पूर्ण विवरण केले. सर्व नाटकमंडळींबरोबर सर्वानी मिळून भोजन केले.
 या 'सीतास्वयंवर' नाटकाचे जसजसे प्रयोग होऊ लागले तसतशी नाटकात सुधारणा होऊ लागली. प्रारंभी सूत्रधार सरस्वती - आवाहनांची पदे म्हणत असे. मग तो सर्व देवतांच्या स्तवनपर गीतानी वातावरण भारून टाकी. "पात्रांच्या अंगी अत्तम वक्तृत्वशक्ती व धीटपणा यावा" असा वर मागून घेई. सूत्रधार नाटकाचे कथानक, प्रसंग वगैरेची प्रस्तावना करी. मग पात्रे आपापली भाषणे कथानकाच्या अनुषंगाने म्हणत असत व प्रसंगानुसार सूत्रधार व त्याचे गायकमंडळ प्रथमपासून अखेरपर्यंत सर्व पदे म्हणत !,

 श्रीमंतांच्या प्रोत्साहनामुळे 'सीतास्वयंवर' प्रमाणे विष्णुपंतानी, रामायणातील प्रसंगांवर ८-१० नाटके रचली. श्रीमंताना स्वतःला हा नवीन करमणुकीचा प्रकार



सांगली आणि सांगलीकर....

.२६