पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विष्णुपंताना त्या सुमारास ब्रिटीश फौजेत नोकरी मिळण्याची संधी आली होती तरी श्रीमंतानी त्याना सोडले नाही.
 ती वेळ जवळ आली होती. मराठी नाटक जन्माला येण्याची.
 १८४२ साली अशीच कर्नाटकातील भागवत नावाची दशावतारी खेळ करणारी मंडळी सांगलीस आपले खेळ घेऊन आली. राजेसाहेबानी त्यांच्या परिपाठाप्रमाणे त्या मंडळींचे दोन-दोन प्रयोग श्री गणपती मंदिरात केले. त्या खेळात विचित्र वेष घेऊन सर्व मंडळी अपस्वरात गात व नाचत. त्यातील सर्व पात्रे वयाने थोराड. स्त्री भूमिका करणारी ४०-४२ वर्षाची मंडळी होती. त्यांची सोंगे विद्रूप दिसत, भाषणे नुसती धांगडधिंगा स्वरूपाची, कलाहीन, त्यामुळे श्रीमंताना किळस आली. ते स्वतः रसिक आणि गुणग्राही होते. तेव्हा त्यांच्या मनात ठिणगी पडली. जुन्या पौराणिक कथांवर आधारित, सर्व स्त्री-पुरूषाना एकत्र बसून पाहण्याजोगी एखादी कलाकृती तयार करता आली तर? जवळ बसलेल्या विष्णुपंताना ते म्हणाले. "तुम्ही मनावर घ्याल तर यापेक्षा चांगल्या नाट्यकृती लोकांपुढे आणू शकाल. आम्ही सर्वप्रकारे तुम्हाला साहाय्य करु.'
 विष्णुपंतांच्या ठिकाणी असलेली कल्पकता व रचनाचातुर्य श्रीमंत जाणून होते. आणि विष्णुपंत काय? सदैव अत्साहाने रसरसलेले. नवीन काही करायचे म्हटले की त्याना स्फुरण चढे. श्रीमंताचे बोलणे ऐकून ते आव्हान त्यानी ताबडतोब स्वीकारले.

 पण थोड्याच दिवसात त्याना कळून चुकले की आपले स्वीकारलेले आणि ते सुध्दा आव्हान म्हणून, काम खरंच कठीण आहे. काम करायला नटवर्गच मिळेना. नटवेष घेणे म्हणजे हलक्या दर्जाचे काम म्हणून कोणी पुढे येईना. शेवटी श्रीमंतांच्या कानावर ही वस्तुस्थिती घालून, अशी दवंडी पिटण्यात आली की नाटकात काम करणाऱ्या मंडळीना श्रीमंत वंशपरंपरेच्या जमिनी देणार आहेत व सरकारी नोकरीत ठेवणार आहेत! याचा अपेक्षित परिणाम झाला. माणसं जमू लागली. स्त्रीभूमिकेकरिता कोकणातून सुस्वरूप, चुणचुणीत मुलं आणली गेली. नंतर आपल्या चित्रकलेचे, शिल्पकलेचे ज्ञान पणाला लावून विष्णुपंतांनी पात्राला लागणारी किरिट कुंडले, बाहुभूषणे, कमरेच्या मेखला वगैरे स्वहस्ते बनविल्या ऋषीवेषांकरिता लागणाऱ्या दाढ्या, मिशा, जटा, स्त्रीवेषाकरता लागणारे टोप, अलंकार, स्वतः विणून तयार केले. देव, दैत्य, स्त्रीपार्टी, ऋषिपार्टी इत्यादी पात्रांकरता योग्य अशा सोंगांच्या नकला स्वतः लिहून काढल्या. सर्व पात्रांनी त्या पाठ केल्यावर, शृंगार, वीर, करूण रसाला अनुकूल असे हावभाव कसे करावेत याचे शिक्षण दिले. स्वतः हावभाव करून भाषणे म्हणून दाखविली. यापुढचे अवघड काम म्हणजे नाटकातील गाणी. नाटकाला योग्य अशी काव्ये कुठून मिळणार ? मग सर्वांस


सांगली आणि सांगलीकर........................................................ .२५