पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाराजीने 'हा मुलगा नुसता अनाडक्या करतो शाडू बनवून मातीची चित्रे करत बसतो" वगैरे सांगितले. श्रीमंतानी चित्रे पहाण्याची अिच्छा व्यक्त केल्यावर विष्णुपंतानी सगळी चित्रे मांडली. इतक्या लहान वयातील मुलाचे हे कर्तृत्व पाहून तो गुणग्राही राजा आश्चर्यचकित झाला. असा गुणी मुलगा आपल्याजवळ असायला हवा अशा हेतूने त्यानी त्याला आपल्या खाजगीकडे घेतला.
 अशा तऱ्हेने राजवाड्यात विष्णुपंतांचा शिरकाव झाला. त्या मंत्रतंत्रवाल्या बुवाने सांगितलेलं भविष्य खरं व्हायचं होतं तर !
 श्रीमंतानी पूजा-अर्चा, जप- जाप्य या सर्व कामात विष्णुपंत त्यांच्या दिमतीस असत. याच काळात श्रीमंतानी त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल वेगवेगळ्या कसोट्या घेऊन त्यांची परीक्षा पाहिली होती. श्रीमंताना रात्री लौकर झोप येत नसे, तेव्हा ते विष्णुपंतांकडून रामविजय, हरिविजय, शिवलीलामृत, कथासारामृत, भक्तिलीलामृत वाचून घेत असत. मग वाचून झाल्यावर श्रीमंत, विष्णुपंताना मुद्दाम प्रश्न करीत. "बघ किती छान गोष्टी आहेत. अशा आजच्या काळात लिहिता तरी येतील का ?" मग डिवचलेल्या विष्णुपंताना आवेश चढे. आव्हान स्वीकारल्यासारखे करुन ते म्हणत "त्यात काय ? सहज लिहता येईल." मग एक दिवस श्रीमंतानी त्याना एका कथेतील, “जगात सत्यवर्तनाचे फळ" या तात्पर्यावर गोष्ट लिही बघू." असे म्हटले. मग विष्णुपंतानी चिंतन करुन कल्पकतेने “सत्यदास" नावाची रसभरीत गोष्ट लिहून दाखवली. गोष्ट ऐकून श्रीमंत खूश झाले. मग काय ? अभयतांमधील एक न्यारा खेळच सुरु झाला. अशाप्रकारे लिहिलेल्या पाच-पंचवीस गोष्टींचे सहज एखादे पुस्तक झाले असते.
 पण सहजी घडलेल्या या खेळातून श्रीमंताना विष्णुपंतांच्या सुप्त गुणांची यथार्थ कल्पना आली असेल आणि विष्णुपंतानाही आपल्या ठायी काही वेगळी प्रतिभा आहे याची जाणीव झाली असेल.
 नियतीच त्यांच्याकडून हा खेळ खेळवून घेत असावी. त्यातूनच एक इतिहास घडणार होता.

 श्रीमंत आप्पासाहेब हे गुणग्राही होतेच. त्यांच्या रसिकतेमुळे दूरदूरचे शास्त्री, पंडित, गवई, चित्रकारापासून, पहिलवान, अश्वरोहणतज्ञ, निरनिराळी अमदी जनावरे घेऊन हिंडणारे सौदागर अशा सर्व प्रकारचे लोक सांगलीत येत असत आणि राजेसाहेब त्यांची परीक्षा घेऊन प्रत्येकाचा यथायोग्य परामर्श घेत असत. याच काळात केव्हातरी शाहीर अनंत फंदी सांगलीस राजेसाहेबांकडे येऊन राहिले होते. त्यांच्याबरोबर विष्णुपंतांचा काळ फार आनंदात जाई. त्यांच्याशी होणाऱ्या गप्पांतून विष्णुपंताना खूप काही गवसले, जे त्याना भावी काळात अपयोगी पडले. त्यामुळे


सांगली आणि सांगलीकर.................................................................. २४