पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांच्या ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात एकवटलेले होते ही वस्तुस्थिती आहे.
 अशा या विष्णुदासांचा जन्म १८१९/२० सालचा असावा! त्यांचे अधिकृत चरित्र लिहिणाऱ्या चरित्रकाराने म्हणजे प्रत्यक्षात त्यांचे नातू असणाऱ्या रावसाहेब भावे यानी सुध्दा नक्की तारीख दिलेली नाही. भावेमंडळी मूळची कोकणातली. नशीब काढायला इतर अनेक घराणी देशावर आली तसे हे भावेघराणे देशावर आले. विष्णुपंत भावे यांचे वडील अमृतरावभाऊ सांगली संस्थानच्या लष्करात होते. लहानपणापासून विष्णुपंत जात्या व्रात्यच होते. त्यांचे बालपण आजोळी म्हणजे सावळगीस गेले. कानडी मुलुखातील या गावातील वास्तव्यामुळे त्याना कन्नड भाषा अवगत झाली. झाडावर चढणे, पतंग अडवणे अशा अनाडक्या करण्याकडे त्यांचा कल असे. तत्कालीन रिवाजाप्रमाणे संध्या, पूजाअर्चा, वैश्वदेव, रुद्र त्याना शिकवला गेला होता. वयाच्या ११-१२व्या वर्षी सांगलीत आल्यावर, त्रिंबकपंतगुरुजी नावाचे एक शिक्षक होते, त्यांजकडे मराठी अक्षर, थोडाफार हिशोब, जमाखर्च वगैरे शिक्षण झाले. १८३०-३१च्या काळात शिक्षण असे ते काय असणार? वर्ष दीड वर्ष शिकले, पण अधिक ओढा गाण्या-बजावण्याकडे होता. त्यावेळी सांगली संस्थान दरबारात, सखारामबुवा काशीकर नावाचे गायक होते. त्या काळातील नावाजलेले गायक अब्दुल्लखान यांचे ते शिष्य होते. या सखारामबुवांकडे विष्णुपंत गाणे शिकण्यास जात. बरंचसं गाणं आणि तालाच्या बारकाव्याचं शिक्षण त्याना बुवांकडे मिळालं. पेशवाईचा अंत होऊन ब्रिटीश अंमल स्थिरावलेला होता. मर्दुमकी गाजवण्याला वावच नव्हता म्हणून लोक गाण्याबजावण्यात, लावण्या गुणगुणण्यात मशगूल होते. अशा लोकांमध्ये विष्णुपंताचा वावर जास्ती असे. मात्र त्यामुळे त्याना काही मिश्र रागातील लावण्यांच्या चाली अवगत झाल्या. नंतर विष्णुपंतांची, मंत्र-तंत्र करणाऱ्या एका मांत्रिकबुवांशी ओळख झाली. ती ओळख एवढी घट्ट झाली की त्या बुवाबरोबर पळून गेले. घरच्या लोकानी शोधाशोध करुन पाठलाग केला. विष्णुपंतांची समजूत घातली. बुवांची समजावणी केली. शेवटी बुवानीच विष्णुपंताना सांगितले की “तू आता परत जाऊन पंचमुखी मारुतीची आराधना कर म्हणजे तुला संपत्ती, संतती आणि कीर्ती यांचा लाभ होईल.” तेव्हा कुठे स्वारी परत आली. पंचमुखी मारुतीची आराधना चालू असतानाच त्याना चित्रकलेची आणि शिल्पकलेची आवड लागली. शाडू तयार करुन मातीची चित्रे बनवण्याचा त्याना छंद लागला. सांगली गावाचा देखावा, बाजार, श्रीमंत सरकारांची चित्रे त्यानी तयार केली.

 एकदा श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब (पहिले) फिरत फिरत विष्णुपंताचे वडील भाऊसाहेब याजकडे आले होते. घरातील सर्वाचे क्षेमकुशल विचारले. मुलांची विचारपूस केली.सर्वाची माहिती देता देता विष्णुपंतांचे वडील, विष्णुपंतांविषयी मात्र


सांगली आणि सांगलीकर..................................................................................................... .२३