पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
महाराष्ट्राचा आद्य नाटककार
विष्णुदास भावे



 सांगलीला ‘नाट्यपंढरी' म्हणून अत्यंत श्रध्देने आणि भाविकतेने प्रथम गौरवले नटवर्य कै. केशवराव दाते यानी.
 आणि हा गौरव प्राप्त करुन दिला सांगलीच्या सुपुत्राने. त्याचे नांव विष्णुदास भावे. मराठीतील पहिले नाटक 'सीतास्वयंवर' याचा प्रथम प्रयोग १८४३ साली त्यानी सांगलीत केला.दीडशेहून अधिक वर्षापूर्वी सुरु झालेला मराठी नाटकाचा हा अक्षय झरा, आता एखाद्या विशालकाय महासागराचे स्वरूप प्राप्त करुन बसला आहे., म्हणून विष्णुदास भावे याना सार्थपणे मराठी नाटकांचे 'जनक' म्हटले जाते. मात्र त्याना श्रेय देताना एका वस्तुस्थितीचा विसर पडतो. तो म्हणजे ज्यांच्या कल्पनेतून, प्रेरणेतून आणि भक्कम आश्रयातून हा पहिला वहिला नाट्यप्रयोग साकारला त्या चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन या सांगली संस्थानच्या पहिल्या अधिपतीचे कळत नकळत विस्मरण होते. विष्णुदास भावे यांच्या बरोबरीने मराठी नाट्यसृष्टी जन्मास घालण्याचे श्रेय त्याना आहे.
 या ऐतिहासिक घटनेला १९४३ साली शंभर वर्षे पूर्ण झाली म्हणून समस्त नाट्यप्रेमी जनतेने सांगलीला नाट्यशताब्दी अत्सव थाटामाटात साजरा केला. त्याच प्रसंगी सांगलीचे ‘नाट्यपंढरी' हे कौतुकाचे बारसे केशवराव दाते यानी केले.
 पण हे विष्णुदास भावे होते तरी कोण ?

 मराठी नाटकाला जन्म देणारा माणूस म्हणजे कुणी तरी विद्वान, पंडित असावा अशीच कोणाचीहि प्रथम कल्पना होईल. पण प्रत्यक्षात विष्णुदास भावे हे तसे अगदी सर्वसामान्य गृहस्थ होते. निदान 'सीतास्वयंवर' नाटकाच्या प्रथम प्रयोगाच्या वेळी तरी. त्यांचा ज्ञात असलेला जीवनपट अलगडून बघितला तर काय आढळेल? तर विष्णुदास कधी चित्रकार, कधी मूर्तिकार, कधी बांधकामतज्ञ, तर कधी चिनी मातीच्या बरण्या बनवू पहाणारा कारखानदार अशा विविध रूपात ते भेटतील. क्वचित् प्रसंगी शेती कसणाऱ्या चक्क शेतकऱ्याच्या भूमिकेत दिसतील. एकूण कृष्णाकाठचा हा ब्राह्मण अठरा पगड जातीच्या कलाकुसरीत रमलेला दिसेल ! अर्थात या सर्वच कलांचे ज्ञान


सांगली आणि सांगलीकर............................................................................... .२२