पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांची लोकप्रियता राजसिंहासनावरून पायसुतार झाल्यावरसुध्दा सांगलीकरांच्या मनात अढळपणे टिकून राहण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे संस्थान खालसा झाल्यावर सांगलीतच स्थायिक होण्याचा त्यांचा निर्णय. वास्तविक जेथे राज्य केले तेथेच सामान्य प्रजाजन म्हणून राहायचं ही बाब दिसते तितकी आचरणास सोपी नाही. दरबार, पालखी, सलामी, जागोजागचे मानमरातब, संस्थानी नरेंद्रमंडळाच्या बैठका, परदेश वाऱ्या, दिल्लीच्या फेऱ्या, गर्व्हनर, व्हॉइसरायच्या गाठीभेटी सर्व काही बंद. पण जिथं प्राजक्ताची फुलं वेचली तिथं शेणकुटं कशी गोळा करू असा दळभद्री विचार राजेसाहेबांच्या मनाला कधी शिवलापण नाही. इतर ठिकाणचे संस्थानिक आपापला पैसा अडका, जडजवाहर गोळा करुन पुण्या-मुंबईकडे जाऊन राहिले. पण राजेसाहेब, रंगमंच गाजवणाऱ्या नायकाने, सहजपणे सामान्य प्रेक्षकात येऊन बसावे अितक्या सहजतेने सामान्य प्रजानन बनले, लोकात मिसळून गेले. सांगलीच्या उत्कर्षाच्या योजनांमध्ये त्यानी पूर्वीच्याच आत्मीयतेने त्यांनी रस घेतला. उलट ते कांही आपले राजे नाहीत तेंव्हा त्यांचा आपला काय संबंध, असे म्हणून अपरणे झटकण्याची वृत्ती सांगली संस्थानच्या प्रजाजनानी चुकून कधी दाखवली नाही. सांगली संस्थान खालसा झाल्यावर दहा-बारा वर्षानी संस्थानच्या जुन्या कर्नाटकी भागात, शिरहट्टी भागात, राजेसाहेब गेले असता, त्यांचे जे काही अभूतपूर्व स्वागत, मिरवणुका मानपत्रे अशा स्वरूपात झाले, तेव्हा हा स्थितप्रज्ञ राजा गहिवरून म्हणाला, “तुम्हा लोकांचे प्रेम बघून आम्ही खरोखर भारावून गेलो आहोत. हे प्रेम निरपेक्ष आहे. आता आमच्याकडून काहीही मिळण्याची परिस्थिती नाही, तशी तुमची अपेक्षाहि असण्याचे कारण नाही. तरीहि प्रेमाचा अत्साह अनुपमेय आहे. त्यात कृत्रिमपणाचा अंशही नाही."
 १९६० साली सांगलीच्या जनतेने राजेसाहेबांचा ७० वा वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा केला. भारत सरकारने पण त्याना 'पद्मभूषण' पदवी देऊन सन्मानित केले.
 २३ फेब्रुवारी १९६५ रोजी शांतपणे हा लोकांचा राजा काळाच्या पडद्याआड गेला. तेव्हा प्रजाजन ढसढसा रडले तर नवल नाही पण त्यांच्या लाडक्या हत्तीने सुध्दा त्यांच्या पार्थिवावर मूकपणाने अश्रू ढाळले!
 कृष्णामाईच्या काठावर हा राजा आता चिरनिद्रा घेत आहे. शेजारी वाहणारी कृष्णामाई पावसाळ्यात समाधीपाशी 'वर' येऊन तिच्यावर अभिषेक करते. या राजाच्या असीम त्यागापोटी, 'जनता-जनार्दनाच्या सेवेसाठी आपण अभे आहोत' या जाणिवेने आयर्विन ब्रिज 'खडा' पहारा देत आहे.
 जोवर कृष्णेचा प्रवाह अखंड वाहात राहील तोवर सच्चा सांगलीकर या आपल्या पित्यासमान राजाला कधीच विसरणार नाही, नव्हे विसरूच शकणार नाही!

●●●

सांगली आणि सांगलीकर................................................................ .२१