पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ठिकाणी असत, हे आता सर्वश्रुत झाले आहे.
 एखादा समंजस आणि शहाणा गृहस्थाश्रमी ज्याप्रमाणे सचोटीने वागून ठराविक अत्पन्नात नेकीने संसार करतो, तसा राजेसाहेबानी सांगली संस्थानचा संसार केला. त्यानी राज्यसूत्रे हाती घेतली तेव्हा संस्थानचे उत्पन्न रु. १०,०७०००/- इतके होते, ते राजवटीच्या अखेरीस तिपटीचे वर म्हणजे रु.३३,४४०००।- इतके होते. संस्थानची शिल्लक, नगद रक्कम, सरकारी कर्जरोखे, बाहेरच्या ठेवी वगैरे जमेस धरून संस्थानची मालमत्ता, एक कोटी रूपयांपेक्षा थोडी अधिकच होती. सांगली संस्थानचा छोटा पसारा आणि पन्नास वर्षापूर्वीची रूपयाची किंमत लक्षात घेतली, तरच या शिलकीचे महत्त्व उमजेल. या संपन्नतेचे मुख्य कारण म्हणजे प्रत्येक बाबीवर उधळपट्टी न करता, शहाणपणाने केलेला खर्च, असेच द्यावे लागेल. हातात निरंकुश सत्ता असतानासुध्दा इतर अनेक संस्थानिकांप्रमाणे, राजेसाहेबानी कधीच डामडौल, अधळपट्टी केली नाही. आपला स्वत:चा खाजगीचा खर्च १९३० पासूनच वेगळा ठेवला. अगदी जाणीवपूर्वक अगदी विलीनीकरणापर्यंत म्हणजे १९४८ सालपर्यंतसुद्धा खाजगी व दौलत (म्हणजे स्वतःचा कौटुंबिक खर्च आणि सर्व संस्थानी खर्च) यांची रीतसर विभागणी अनेक संस्थानातून झालेली नव्हती. ही वस्तुस्थिती इथे आवर्जून लक्षात घेण्यासारखी आहे. १९३० मध्ये खाजगी नेमणूक, संस्थानी अत्पन्नाच्या वीस टक्के होती तर तीच रक्कम १९४६-४७ च्या सुमारास १० टक्के इतकी खाली उतरली होती ! वैयक्तिक डामडौलाचा मोह, राजेसाहेब संस्थानी हिताच्या बाबींचा विचार करून कसा टाळत, याचे एक आदर्श आणि बोलके अदाहरण आहे. राजेसाहेब आणि त्यांचे कुटुंबीय सांगली गावाबाहेर माळबंगल्यावर राहात. हा भाग तसा ओसाड आणि निवासस्थानातील खोल्या जुन्या पध्दतीच्या होत्या. तेव्हा राजेसाहेबांसाठी एक भव्य 'राजप्रासाद' बांधण्यासाठी ६-७ लाखाची रक्कम वेगळी काढण्यात आली होती. त्याच सुमारास कृष्णा नदीच्या वारंवार येणाऱ्या पुराच्या पाण्याचा प्रजाजनाना त्रास होतो, वाहतूक अडते म्हणून कृष्णानदीवर मोठा पूल (सध्याचा आयर्विन ब्रिज) बांधण्याची निकड अत्पन्न झाली. यासाठी संस्थानला पैसा कमी पडू लागला तेव्हा राजेसाहेबानी क्षणाचाही विचार न करता 'राजप्रासादाचा’विचार बाजूला ठेवला आणि ती सारी रक्कम पुलाच्या कामासाठी वापरली ! या पुलाने सांगलीकरांना पुण्या-मुंबईकडील विशाल जगताची कवाडे अघडून दिली. आयर्विन ब्रिजवरून मौजेने फेरफटका मारणाऱ्या सांगलीकरांनी या वस्तुस्थितीचे कृतज्ञतापूर्वक स्मरण ठेवायला हवे! अशा अनेक हकीगती केवळ विस्तारभयास्तव सांगता येत नाहीत.

 सांगलीच्या राजेसाहेबांचे सर्वगुणसंकीर्तन करताना असे म्हणावेसे वाटते की,


सांगली आणि सांगलीकर.......................................................... २०