पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नाही, याचे प्रमुख कारण म्हणजे बालपणापासून अंगी रुजलेली आणि वाढत्या वयाबरोबर विकसित झालेली आध्यात्मिक वृत्ती. आपल्याभोवती संतप्रवृत्तीच्या माणसांना जमवून, त्यांची कदर करणारा त्यांच्यासारखा गुणग्राही राजा विरळा. याच भावनेतून श्रीमळणगावकर महाराज, श्रीनारायणमहाराज केडगावकर, सोनोपंत दांडेकर यांच्याशी त्यांचा संबंध आला. पंजाबमधील सुप्रसिद्ध संत सावनसिंग यांचा अनुग्रह त्यानी घेतला होता. गुरूदेव रानडे यांजसारखे एकान्तप्रिय संत, आपल्या निंबाळच्या आश्रमातून केवळ राजेसाहेबांमुळेच सांगलीत येऊन रहात. राष्ट्रपती डॉ. राधाकृष्णन यांजसारखे थोर तत्त्वज्ञ आवर्जून सांगलीस येत. तथापि राजेसाहेबांचे एक वैशिष्ट्य असे की त्यानी आपल्या अध्यात्मप्रेमाचा, राज्यकारभार वा अितर विहित कर्तव्ये यात बाधा येईल इतका अतिरेक कधी केला नाही.
 सौजन्य, सहिष्णुता, दीर्घोद्योग, दातृत्व, परंपरेचा अभिमान असे अनेक गुणविशेष त्यांच्या ठिकाणी होतेच; पण यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे 'वाणीचे पावित्र्य' त्यानी कसे काय संभाळले हे एक कोडेच होते. राज्यकारभाराच्या ओघात मनाची अवस्था प्रक्षुब्ध होण्याचे प्रसंग अनेकदा येत असतील पण त्यांच्याबरोबर काम करणारे सांगतात की, मुखावाटे अभद्र भाषा क्वचितच बाहेर पडे! चेहेऱ्यावरील प्रसन्न वृत्ती आणि गोड हास्य सहसा लोप पावत नसे. इंग्रजीमधील 'जंटलमन' शब्दात अत्कृष्टतेच्या आदर्शाची कल्पना सामावलेली आहे. कनिष्ठ, थोर, यांजबरोबरच्या संभाषणात, व्यवहारात त्यांची अभिजात सभ्यता दिसत असे. म्हणूनच पट्टाभिसितारामय्यासारखे राजकारणी असोत वा सी. व्ही. रमणसारखे नोबेल पारितोषिकविजेते शास्त्रज्ञ असोत, सर्वचजण त्यांच्या जातिवंत सभ्यतेने भारावून जात. A Gentleman is a gentleman at all points असं म्हणतात ते त्यांच्याबाबतीत सर्वार्थाने खरं होतं.

 याचा अर्थ असा नाही की राजेसाहेब संपूर्णपणे निर्दोष होते. हट्टीपणा, दुराग्रहीपणा, तापटपणा, प्रसंगोपात्त जरूर उफाळून येत असे, पण त्याचा अतिरेक कधी होत नसे. प्रजेला हक्क मिळवण्यासाठी झगडावे लागे, भांडावे लागे मग सभाबंदी, लाठीमार, तुरुंगवास असे प्रकार जरूर होत, पण हे सर्व म्हणजे खेळाचाच एक भाग होता. राजेसाहेबांच्या विरोधात लोकलढा चालवणारे प्रजापरिषदेचे पुढारी गणपतराव अभ्यंकर कठोर वाक्प्रहार करत. पण त्यानी सुध्दा एकदा जाहीरपणे सांगितले की “सांगलीत म्हणूनच मी अशी संस्थानी अंमलाविरूध्द चळवळ करू शकलो, इतरत्र हे अशक्य होते.” १९४२च्या आंदोलनात अरुणा असफअली, अच्युतराव पटवर्धन यासारखे क्रांतिवीर सांगलीत येऊन आश्रय घेऊ शकत असत. वसंतदादांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे भूमिगत काळातील अड्डे सांगलीत अनेक


सांगली आणि सांगलीकर........................................................... .. १९