पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 प्रत्येकाने संस्थानच्या उत्कर्षासाठी छोटे-मोठे काम करावे, अशी रास्त अपेक्षा ठेवणारे राजेसाहेब, स्वतः तसा विचार अहर्निश करीत. त्यामुळेच त्यानी नामवंत अर्थतज्ञ धनंजयराव गाडगीळ आणि प्रा. डी. जी. कर्वे यांची कमिटी स्थापन केली. सांगली संस्थानच्या भौतिक संपत्तीचा अंदाज घेऊन तिचा विकास शेती व लहानमोठे अद्योगधंदे या क्षेत्रात घडवून आणण्याच्या दृष्टीने या कमिटीला शिफारस करण्यास सांगण्यात आले होते. अभ्या भारतवर्षात आदर्शभूत गणल्या गेलेल्या या कमिटीच्या शिफारसी कार्यान्वित करण्यासाठी प्रख्यात अर्थतज्ञ आणि विलिंग्डन महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. पी. एम. लिमये या खास अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली. या विचारमंथनातूनच पुढे राजेसाहेबानी मुंबईचे सुप्रसिध्द अद्योगपती श्री. वामन श्री आपटे यांचेबरोबर दोन कोटी भांडवलाचे कारखाने काढण्याचा करार केला. यातून साखर कारखाना, वनस्पती कारखाना, सूतगिरणीं, कापडगिरणी असे अनेक अद्योगधंदे अभे राहायचे होते. दहा लाखाची मशिनरी आली. दुर्दैवाने या साऱ्या योजनेवर पाणी पडले! गांधीहत्येनंतर झालेल्या दंगलीत सगळ्या योजनेची राखरांगोळी झाली. राजेसाहेबानी संस्थानच्या सर्वागीण विकासासाठी एक पंचवार्षिक योजना आखली होती. विलिनीकरणामुळे ती फलद्रूप झाली नाही ही गोष्ट वेगळी. पण अशी योजना आखणारे हे पहिलेच संस्थान असावे.
 आज आम्ही लोकशाहीचे डांगोरे पिटतो पण लोकशाहीचे रोपटे रुजवण्याचा प्रयत्न राजेसाहेबानी किती पूर्वी केला होता, हे बघितल्यावर कुणाहि लोकशाहीप्रेमी माणसाचा अर भरून येईल. बर्कसाहेबानी स्थापन केलेल्या रयतसभेला हळूहळू अधिकाधिक अधिकार देण्यास राजेसाहेबानी जाणीवपूर्वक सुरवात केली. १९३० साली रयतसभेला नियमबध्द स्वरूप दिले. तिच्या सरकारी-निमसरकारी सभासदांची संख्या वाढवली. अनेक प्रकारची मोकळीक दिली. त्याचा अनुकूल परिणाम पाहून १९३८ मध्ये संस्थानच्या कार्यकारी मंत्रिमंडळात दोन मंत्री, निवडून आलेल्या सभासदांमधून घेतले. पुढे १९४६ साली तर राज्यसभेस पूर्ण जबाबदार राज्यपद्धतीचे अधिकार दिले.

 वास्तविक राजा आणि लोकशाही या परस्पर विरोधी संज्ञा. पण राजा असूनहि लोकशाही नांदू शकते ही वस्तुस्थिती इंग्लडची, तर राजा नसुनही लोकशाही नाही ही स्थिती रशियाची. या दोन्ही गोष्टी राजेसाहेबानी बघितल्या होत्या. नरेंद्रमंडळाचे प्रतिनिधित्व करताना ते इंग्लंडमधे राहिले होते. तेथील लोकशाही पाहून प्रभावित झाल्यामुळेच, त्यानी संस्थानात लोकशाही रूजवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. राजसिंहासनावर असतानाच आपला 'राजसंन्यास' पूर्ण करण्याचा त्यांचा प्रयत्न पाहून, त्यांच्या मनाच्या प्रगल्भतेची कल्पना येते. लोकांमधील राजकीय हक्कांची


सांगली आणि सांगलीकर..................................................... १७