पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रमाण पाहून, सर्व अद्ययावत साहित्याने युक्त अशी एक मोठी डेअरी काढण्यास राजेसाहेबानी प्रोत्साहन दिले. त्याकाळात सुध्दा ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष पुरविले जावे म्हणून 'ग्रामोद्योग योजना' राजेसाहेबानी सुरु ठेवली होती. एकूण करप्राप्तीचा विशिष्ट भाग यासाठी वापरला जात असे. संस्थानतर्फे दोन लाखांचे शेअर कॅपिटल घेऊन मध्यवर्ती सहकारी बँक स्थापन करण्यात आली होती.

 आज महाराष्ट्रात औद्योगिक प्रगतीचा एवढा मोठा डोंगर अभा राहिलेला दिसतोय. पण त्याचा उगम दक्षिणेतील सांगली, औंधसारख्या संस्थानातून झाला आहे, याची कल्पना अनेकाना नसेल. पारतंत्र्याच्या कालात, जसजशी राजकीय जागृती होऊ लागली, तसतशी स्वदेशीची चळवळ मूळ धरू लागली. स्वदेशी चळवळ म्हणजे एकप्रकारे ब्रिटीश सत्तेवरचा हल्लाच. तेव्हा सरकारचा रोष पत्करून स्वदेशी अत्पादनव्यवसायाला प्रोत्साहन देणे संस्थानिकाना अवघडच. १९०७ साली सुरू झालेल्या रेल्वेमुळे व्यापाराची मोठीच सोय झाली. दांडेकर, भिडे मंडळींच्या प्रयत्नातून लोखंडी मोटा, पिठाच्या चक्क्या, शेंगा फोडण्याची यंत्रे अशी अत्पादने सुरु झाली. राजेसाहेबांच्या आधाराने विष्णुपंत तथा दादासाहेब वेलणकरानी वस्त्रोद्योगात पाऊल टाकून श्री गजानन मिल नावारूपाला आणली. सांगलीच्या आसपास साखर कारखाना नव्हता. त्यांच्या प्रोत्साहनामुळे शिरगावकर बंधूंचा साखर कारखाना सांगली संस्थानातील उगारला अभा राहिला. या सर्वांच्या प्रयत्नामुळे सांगली संस्थानात अुद्योगाची वाढ झाली. सांगली हळदीची पेठ म्हणून वर्षानुवर्षे सुविख्यात आहे. खेरीज गूळ, मिरची, शेंगा वगैरे सर्व प्रमुख मालाचा व्यापार सांगलीतून होतो.

 व्यापार अुद्योगधंदा म्हटला की हरघडीच्या व्यवहाराला बँकेची आवश्यकता आहे हे दिसून येताच राजेसाहेबानी स्वतःचे भांडवल घालून सांगली बँकेची स्थापना करण्यात पुढाकार घेतला. सांगलीच्या अद्योगधंद्याच्या वाढीला या बँकेच्या स्थापनेमुळे मोठीच चालना मिळाली.

 या सर्व प्रयत्नांबरोबरच सांगलीची औद्योगिक, व्यापारी भरभराट होण्यास एक महत्वाचे कारण लक्षात घेणे आवश्यक आहे, ते म्हणजे राजेसाहेबानी निर्माण केलेली आणि जपलेली सुरक्षिततेची भावना. सांगलीत जीवित आणि वित्त सुरक्षित असल्याची भावना राजेसाहेबांच्या चोख राज्यकारभारामुळे, निःपक्षपाती न्यायव्यवस्थेमुळे वाढीस लागली. वेळप्रसंगी त्यांच्या कारभारविरोधात केलेली टीका सुध्दा सहनशीलतेने ऐकून घेण्याची राजेसाहेबांची प्रवृत्ती होती. इतर संस्थानांतून आढळणारा लहरीपणा, कायदा पायदळी तुडवून, 'हम करेसो कायदा' असा प्रकार येथे नव्हता. या सर्व गोष्टींचा सम्यक् परिणाम होऊन व्यापारी, अुद्योजक, सराफ, अडत्ये, सांगली संस्थानकडे आकर्षित झाले.


सांगली आणि सांगलीकर..............................................................१६