पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नव्हता. महाराष्ट्र-कर्नाटकातील सोलापूर, सातारा, बेळगाव अशा जिल्ह्यातून पसरलेला होता. सांगली संस्थानची काही गावे ( शहापूर, शिरहट्टी वगैरे) तर सांगलीपासून दीडशे- दोनशे मैल अशा अंतरावर होती. पण सुदैवाने राजेसाहेबांच्या अज्ञानकालात कॅप्टन बर्क यानी राज्यकारभाराची अुत्तम शिस्त बसवून दिली होती. १९०५ ते १९१० या त्यांच्या कारभारवर्षांत त्यानी रयतसभा सुरू केली. याचीच पुढे राजेसाहेबानी पद्धतशीर जोपासना केली. राजेसाहेबानी संस्थानचा कारभार हाकताना ब्रिटीशांच्या राज्यव्यवस्थेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला होता. “उत्कृष्ट राज्यकारभार हा राज्याचा कणा असतो" हे वचन प्रत्यक्षात आणण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असे. राजा हा जसा प्रजेचा मालक आहे तसा तो त्याचा सर्वात मोठा नोकर आहे, ही भावना त्यांच्या मनात खोलवर रुजली होती. आपला राज्यकारभार अत्तम दर्जाचा रहावा या इच्छेपोटी राजेसाहेबानी ब्रिटीश मुलुखातून सेवानिवृत्त आय. सी. एस. अधिकारी, हायकोर्ट जजेस याना संस्थानात मोठ्या हुद्यांच्या जागांवर नेमले. सर पॅट्रिक कॅडेल, सर वाडिया, दिवाणबहाद्दुर ब्रह्म, बी. एन. डे, ढवळे यांसारख्या कर्तबगार अधिकाऱ्यांच्या बुद्धिमत्तेचा त्यामुळे सांगली संस्थानला लाभ झाला. अर्थात त्यांच्यावर कारभार सोपवून राजेसाहेब स्वस्थ बसत नसत. प्रत्येक खात्याकडे त्यांची चिकित्सक नजर असे. त्यामुळे संस्थानात कुठे खुट्ट झालं तरी त्याना त्याची जाणीव होई. संस्थानच्या प्रगतीसाठी त्यानी केलेल्या प्रयत्नांचा थोडक्यात असा आढावा घेता येईल.

 अनेक भूभागात पसरलेल्या सांगली संस्थानचे एकंदर सहा तालुके : १) मिरज प्रांत २) कुची ३) शहापूर ४) मंगळवेढे ५) तेरदाळ महाल ६) शिरहट्टी. राजेसाहेबानी संस्थानातील निसर्गसाधनसंपत्तीची शास्त्रशुध्द पध्दतीने पाहणी करुन त्या आधारे शेतीसुधारणा करण्याचे ठरविले. या सर्व तालुक्यातील जमिनीच्या सुधारणा करणेचे कामास अग्रहक्क देण्यात आला. ताली बांधण्याच्या कामाचे महत्त्व त्याना पटले. त्यामुळे जमिनीची धूप थांबून, पडणाऱ्या पावसाचे पाणी जमिनीत मुरून, त्याचा पिकास अपयोग होण्याकरता समपातळीवर ताली घालणे हा जमीन सुधारण्याचा मुख्य पाया आहे, ही शेतकी अधिकाऱ्यांनी, त्यांची खात्री करून दिली व राजेसाहेबाना एवढी पटली, की आपल्या अधिकाऱ्यांसमवेत राजेसाहेब स्वतः संस्थानात सर्वत्र हिंडून ताली बांधण्याच्या कामाला त्यानी चालना दिली. प्रसंगी राजेसाहेबानी स्वतः बैलगाडीतून कष्टाचा प्रवास केला. बागायती शेती वाढविण्यासाठी मिरज प्रांत, कुची, शहापूर व तेरदाळ या तालुक्यातील नद्या-ओढे यावर धरणे बंधारे घालून घेतले, गाळाने भरलेले तलाव दुरूस्त केले. शेतीचे शिक्षण, पशुवैद्यकखात्याची मदत, ठिकठिकाणी शेतीच्या खताच्या योग्य साठवणीची पध्दत, फळझाडांची कलमे यासाठी संस्थानतर्फे खास योजना राबवल्या जाऊ लागल्या. सांगली संस्थानातील दूध उत्पादनाचे


सांगली आणि सांगलीकर..............................................................१५