पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मुलुखातील पुढाऱ्यांचे संस्थानातील लोकांशी संबंध येऊ नयेत म्हणून राजेसाहेबांवर ब्रिटीश सरकारचे राजकीय दडपण असे. अितकेच काय पण त्याना एका स्वदेशी कंपनीच्या शेअर्समध्ये पैसे न गुंतवण्याबद्दल पण सांगण्यात आले होते. त्यामुळे एका बाजूला ब्रिटीश सरकार व दुसऱ्या बाजूला आपल्याच संस्थानची प्रजा, यामधील समतोल सांभाळताना राजेसाहेबाना अखेरपर्यंत तारेवरची कसरत करावी लागली. आणि अशी कसरत त्यानी यशस्वीपणे केली हे विशेष. तरीपण एका वैयक्तिक प्रसंगात अतिरेक झाला तेव्हा त्याना आपली नैसर्गिक स्वाभिमानी वृत्ती प्रकट करावी लागली. तो प्रसंग असा:

 श्रीमंत राजेसाहेबाना पूर्ण अधिकार १९९० मध्ये मिळाल्यानंतर त्यांच्या विवाहाचा प्रस्ताव आला. राजेसाहेबानी वऱ्हाडातील वजनदार पुढारी सर मोरोपंत जोशी यांची कन्या कमलाबाई याना रीतसर बघून आपली वधू म्हणून पसंत केली. पण हा विवाह ब्रिटीश राज्यकर्त्याना मान्य नव्हता. कारण उघड होते. सर मोरोपंत पुढारी होते आणि काँग्रेसला जवळचे होते. काँग्रेस ब्रिटीशांच्या विरोधात स्वातंत्र्यप्राप्तीसाठी लढत होती. म्हणून तत्कालीन मुंबई सरकारकडून राजेसाहेबांवर हा विवाह रद्द व्हावा म्हणून दडपण येत होते. पण त्या विशीच्या वयात, नुकतेच राज्यावर बसलेले असतानासुद्धा, राजेसाहेबानी स्वतःच्या निर्णयाशी ठामपणे चिकटून राहण्याचे धैर्य दाखविले. त्या पारतंत्र्याच्या काळात ही गोष्ट नक्कीच अवघड होती. त्यानी स्पष्ट कळविले की " मी पाहून पसंत केलेल्या मुलीशीच लग्न करीन, त्यास सरकारची हरकत असेल तर आजन्म अविवाहित राहीन." शेवटी मोरोपंत जोशी यांचे स्नेही आणि नेमस्त पक्षाचे प्रख्यात पुढारी नामदार गोपाळ कृष्ण गोखले यानी मध्यस्थी केली. मग विवाह सुरळीत पार पडला. (२९ जून १९१०)

 या एकाच घटनेवरून प्रत्येक बाबतीत संस्थानिकांची किती कुचंबणा होत असेल याची कल्पना यावी. इंग्रजी अमदानीत संस्थानिकाना राजकीय दास्यतेमुळे लष्करी पराक्रम दाखविण्यास वाव नव्हता, संधी नव्हती. हाती जी काही राजसत्ता होती त्यावर मर्यादा पडल्या होत्या. ब्रिटीश सरकारची त्यांच्याकडे पाहण्याची दृष्टी नेहमी संशयाची असे. परिणामी, बहुतेक सर्व संस्थानिकांची जीवनदृष्टी प्रजेविषयीचे कर्तव्यपालन करण्यापेक्षा, खावे, प्यावे, मौजमजा करावी इतकीच राहिली. या प्रवृत्तीस अपवाद ठरलेले जे काही मोजके संस्थानिक होते, त्यात सांगलीचे राजेसाहेब एक होते.

 २ जून १९१० रोजी राजेसाहेबानी अधिकृतपणे राज्यसूत्रे हाती घेतली. तत्कालीन सांगली संस्थानचे क्षेत्रफळ ११३६ चौ. मैल इतके होते. पण सगळा मुलूख एकसंध


सांगली आणि सांगलीकर..............................................................१४