पान:सांगली आणि सांगलीकर.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
सांगलीचे लोकोत्तर राजेसाहेब
कै. चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन



 ७ मार्च १९४८ चा दिवस.

 दुसऱ्या दिवशी सांगली संस्थान भारतीय संघराज्यात विलीन व्हायचे होते. १८०१ पासून जवळजवळ दीडशे वर्षे पटवर्धन राजघराण्याची सांगली संस्थानावर सत्ता चालू होती. सांगली संस्थानचा शेवटचा राजा राजवैभवाचा त्याग करून चारचौघांसारखा सामान्य नागरिक होणार होता. राजेसाहेबांच्या, सांगली - माधवनगर रस्त्यावरील, माळबंगल्यावरच्या निवासस्थानी अनेक प्रजाजन जमले होते. श्रीमंत राजेसाहेबांचे आगमन होताच त्यांना पाहून अनेक उपस्थितांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते अश्रू कृतज्ञतेचे होते. पित्याच्या वत्सलतेने पालनपोषण करणाऱ्या राजाला निरोप देताना उत्स्फूर्तपणे आलेले मायेचे ते कढ होते. त्यांचे डोळ्यातील न खळणारे ते पाणी पाहून राजेसाहेब मनोमन गहिवरले. पण क्षणात स्वतःला सावरून म्हणाले, अशा मंगल प्रसंगी अश्रू काय म्हणून? अद्यापासून स्वतंत्र भारताचा नागरिक होण्याचे भाग्य मला मिळत आहे. याबद्दल आपणा सर्वांना आनंदच वाटला पाहिजे” त्यांचे हे सहजोद्वार ऐकताच सर्वांची मने हेलावली. एक अस्फुट हुंदका बाहेर आला.

 हा थोर मनाचा राजा म्हणजे सांगली संस्थानचे भूतपूर्व अधिपती कै. चिंतामणराव अर्फ आप्पासाहेब पटवर्धन, जिथं अमर्याद सत्ता होती तिथंच सामान्य नागरिक म्हणून राहायचं, ही पचनी पडायला अवघड अशी वस्तुस्थिती होती. पण सांगलीच्या राजेसाहेबानी "इदम् न मम" म्हणत, अंगावरचे वस्त्र बदलावे इतक्या सहजतेने आपले राज्य प्रजाजनांच्या झोळीत टाकले. हे त्याना जमले याचे एक कारण म्हणजे त्यांची पराकोटीची पारमार्थिक वृत्ती. आयुष्यभर ते अध्यात्मच जगले.

 श्रीमंत राजेसाहेबांचा जन्म १४ फेब्रुवारी १८९० सालचा. त्यांचे मूळ नाव विनायकरावे चिंतामणराव अर्फ भाऊसाहेब पटवर्धन. पटवर्धन घराण्याचे मूळ पुरूष हरभट पटवर्धनानी दहा वर्षे दुर्वाचा रस प्राशन करून श्रीगजाननाची अखंड सेवा केली होती. या भक्तीचा वारसा समस्त पटवर्धनांत झिरपत आला होताच. त्यात राजेसाहेबांच्या मातोश्री माईसाहेब यानी आळंदीच्या श्रीनृसिंहसरस्वती यांचा अनुग्रह घेतला होता. त्यामुळे धार्मिक वातावरणाचा ठसा, बालवयातच राजेसाहेबांच्या मनावर


सांगली आणि सांगलीकर..............................................................११